लोकजनशक्ती पार्टी रामविलास' सोडणार भाजपची साथ , घटक पक्षाला विश्वासात न घेतल्याने निर्णय

 ​

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : २०१४ पासून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊनही घटक पक्ष या नात्याने कोणत्याही समित्या,पदे,शासकीय प्रक्रिया मध्ये सामावून न घेतल्याने विधानसभा निवडणुकीत 'लोकजनशक्ती पार्टी रामविलास' ने भाजपची साथ सोडण्याचा  निर्णय घेतला आहे.१२ नोव्हेंबर रोजी   सायंकाळी पक्षाच्या  पुणे कार्यालयात बैठक होणार असून त्यात  या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. तसेच  पुढील वाटचालीची दिशा ठरवली जाणार आहे. 

लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे पुणे शहर,जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी  पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

'लोकजनशक्ती पार्टीने भाजपला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे.भाजपने घटक पक्षाला समित्या,पदे,शासकीय प्रक्रिया मध्ये सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.हे आश्वासन पाळले गेले नाही.पक्षाच्या वाढीसाठी त्यामुळे मर्यादा पडल्या आणि कार्यकर्त्यांच्या क्षमतेनुसार राजकीय वाटचालीच्या संधी देता आल्या नाहीत.यामुळे पक्षाचा विस्तारास मर्यादा येत असल्याने भाजप पासून दूर जाऊन स्वतंत्र वाटचाल करण्याच्या निर्णयापर्यंत पदाधिकारी पोचले आहेत.कार्यकर्तेही हा निर्णय तातडीने घेऊन विधानसभा निवडणुकीत आपापल्या आवडीच्या  उमेदवाराचे काम करण्यास मोकळे करावे,अशी मागणी करीत आहेत. 

पुणे जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात या पक्षाचे अस्तित्व आहे.रामविलास पासवान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असताना मोफत धान्य वितरण योजना आली.या योजनेचे काम पारदर्शक पणे आणि प्रभावीपणे व्हावे यासाठी पुण्यात वेळोवेळी मोठी आंदोलने करण्यात आली.पालिका पातळीवरील प्रश्न,सामाजिक उपक्रम,महामानवांचे उत्सव यातून पक्ष वाढीस लागला आहे.

'घटक पक्षांना भारतीय जनता पक्ष गांभीर्याने घेत नसून केवळ वापर करण्यावर त्यांचा भर आहे.त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कुचंबणा होत असून विधानसभा निवडणूक पाहता स्वतंत्र वाटचाल करण्याचा अंतर्गत  दबाव आहे',असे लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे पुणे शहर,जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी सांगितले. 


.

Post a Comment

Previous Post Next Post