प्रेस मीडिया लाईव्ह :
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून गुंडाचा वापर केला जात असल्याचा आरोप होत असतानाच पुण्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास ४० तडीपार गुंडांना पुणे पोलिसांनी पकडले आहे. त्यात पुण्यात ऐन निवडणुकीच्या काळात अन् प्रचाराच्या धामधुमीत हे तडीपार गुंड शहरात हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आरोपींमध्ये तथ्य असल्याचे दिसते. राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.
प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोपी-प्रत्यारोप होत आहेत. हे सुरू असतानाच राजकीय पक्ष तसेच उमेदवार गुंडांचा वापर करत असल्याचाही आरोप होत आहे. दरम्यान निवडणूकीत शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगत काम केले जात आहे. त्यामध्ये बेकायदा हत्यारे बाळगणाऱ्या गुंडांसह तडीपार गुंडावर नजर ठेवली जात असून, त्यांना चाप लावण्यात येत आहे.