प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कॉंग्रेस बंडखोरांवर पक्षाकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. शिवाजी नगर मतदारसंघातून मनिष आनंद यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय बहिरट यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. कसबा पेठ मतदारसंघातून कमल व्यवहारे यांनी रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. तर पर्वती मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या विरोधात आबा बागूल यांनी बंडखोरी केली आहे.
या बंडखोरांना आज शहर कॉंग्रेकडून नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आजपासून सहभागी व्हावे अशी सूचना करण्यात येणार आहे. हे बंडखोर प्रचारात सहभागी न झाल्यास त्यांच्याबद्दलचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसला पाठवण्यात येणार असून त्यांच्यावर उद्या किंवा परवा पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची पुण्यात बैठक होणार असून या बैठकीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना आगामी महापालिका निवडणूकीत नगरसेवकपदाची उमेदवारी न देण्याचा ठराव करण्यात येणार आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आज चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे.