या महाठग अमोलचे अनेक गुन्हेगारी कारनामे उघडकीस.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - बांधकाम व्यावसायिक असलेल्या अमोल पोवार याला बांधकाम व्यवसायात आर्थिक अडचण आल्यामुळे अमोल पोवार याला कोटयावधीचे कर्ज झाले होते. या कर्जातून सुटण्यासाठी त्याने स्वत:चा अपघाती मृत्यू दाखवून ३५ कोटी विमा पॉलीसी मिळवण्यासाठी अमोलने बांधकाम मजुराचा खून करून ती कार ओढयात ढकलून जाळली होती. हा गुन्हा सिध्द झाल्याने गडहिग्लज येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश कोर्ट नंबर एक ओ.आर.देशमुखसो यांनी अमोल जयवंत पोवार (वय ३१ रा.साने गुरुजी वसाहत) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोल्हापूर जिल्हयात हा खटला गाजला होता. २०१६ मध्ये बांधकाम व्यावसायीक अमोल पोवार याने वेगवेगळ्या बॅँकांचे कर्ज घेतले होते. तसेच खासगी सावकारा कडुन घेतलेल्या कर्जामुळे तो अडचणीत आला होता. सावकरांनी कर्जाचा तगादा लावल्यामुळे त्याने आपल्या नावावर ३५ कोटींचा विमा उतरविला होता . त्यानंतर आजऱ्याहून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना एका बांधकाम मजुराला काम देतो असे सांगून कारमध्ये घेतले आणि वाटेत त्या कामगाराचा खून केला. आपले कपडे, घडयाळ आणि इतर वस्तू त्याला घातल्या. त्यानंतर एका ओढ्यात कार ढकलून देऊन कारवर डिझेल ओतून कार पेटवून दिली. या अपघातात आपला मृत्यू झाला असे अमोल पोवार व त्याचा भाऊ विनायक पोवार यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आजरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी गुन्हयाचा तपास केला होता.
उत्तरीय तपासणीत अमोल पोवारने केलेला बनाव उघड झाला. तसेच मृतदेहाचा गळा आवळून नंतर कारमध्ये घातल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी तपास करून अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक पोवार या दोघांना मार्च,२०१६ रोजी अटक केली. या खटल्याचे कामकाज गडहिग्लज येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश देशमुखसो, यांच्या कोर्टात चालू होते.या खटल्यात ३० साक्षीदार होते. मात्र ते फितूर झाले होते. त्यामुळे सरकारी वकील एस. ए. तेली, एच.आर. एस. भोसले यांनी केलेला युक्तीवाद आणि परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानुन जिल्हा व सत्र न्यायाधिश देशमुखसो यांनी अमोल पोवार याला जन्मठेप व ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. तर त्याचा भाऊ विनायक याला सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात तत्कालीन तपास अधिकारी दिनकर मोहिते, आजरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जनार्दन जाधव,सहायक फौजदार अनिल ढवळे,सध्याचे प्रभारी अधिकारी एपीआय नागेश यमगर, कोर्ट पैरवी जयश्री कांबळे, विजय बंदी, जयप्रकाश बेनके, संतोष फराकटे, प्रशांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.