प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदान शांततेत पार पडण्यासाठी जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिसासह नवी दिल्ली, कर्नाटकसह इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागवण्यात आला आहे. उपद्रवी मतदान केंद्रांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले असून, या ठिकाणी हत्यारबंद पोलिस तैनात केले आहेत. त्यामुळे मतदान शांततेत होईल, असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांना सांगितले.
कोल्हापूर पोलीस दलाने या निवडणुकीची तयारी दोन महिन्यांपासूनच केली आहे. सराईत गुंड, गुन्हेगार यांची माहिती काढून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई, हद्दपारी, चांगल्या वर्तणुकीचे बॉन्ड लिहून घेतले आहेत. आचारसंहिता काळात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. कोट्यवधी रुपयांची दारू, गावठी बनावटीची हत्यारे जप्त केली आहेत.
बुधवारी होणारे मतदान शांततेत होण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले आहे. जिल्ह्यातील उपद्रवी केंद्रांची स्वतंत्र यादी केली आहे. खास करून संवेदनशील भाग असलेल्या कागल, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, इचलकरंजी मतदारसंघांवर पोलिसांनी करडी नजर रहाणार आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवण्याचा धोका आहे. यातील काही उपद्रवी केंद्रांवर पोलिसांसह केंद्रीय सशस्त्र दलांचे जवान तैनात केले जाणार आहेत.
वादावादी, हाणामारी अथवा गोंधळ झालेल्या गावांमधील राजकीय नेते, राजकीय गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही अधीक्षक पंडित यांनी दिला आहे. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस मित्र यांनाही खबरदारी घेण्याचे सांगितले आहे.