प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त, पुणे यांच्या वतीने वैशाली इंदाणी-उंटवाल (रो.ह.यो.) सह आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय पुणे,यांनी दि.५ नोव्हेंबर रोजी २७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघास भेट दिली.
या भेटी दरम्यान त्यांनी शहरातील राजीव गांधी भवन येथील ई.व्हि.एम. मशीन स्ट्रॉंगरूमची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सुविधांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच याच ठिकाणी असलेल्या नियोजित मतमोजणी केंद्राची सविस्तर माहिती घेऊन मतमोजणी प्रक्रियेचे नियोजन योग्य पद्धतीने होईल याची काळजी घ्यावी अशी सूचना केली.
त्यानंतर त्यांनी आचारसंहिता कक्ष, परवाना कक्ष, व्हि.व्हि.टी. कक्ष, खर्च निरीक्षण पथक, मतदार सहाय्यता कक्ष तसेच मिडिया व्यवस्थापन कक्षाची पाहणी करून विविध पथकामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक विषयक कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या.
२७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी विधानसभा निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व प्रक्रियेची माहिती दिली. या प्रसंगी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर, सुनिल शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होते.
भेटी प्रसंगी निवडणूक विषयक सर्व कामकाजाची माहिती घेतल्यानंतर सह आयुक्त वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील निवडणूक कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन निवडणूक विषयक कामकाजा साठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी निवडणूक विषयक कामकाज प्रामाणिकपणे करावे असे आवाहन केले.