प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. ११ अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिनिधिक मते ,प्रत्यक्ष मते आणि सिनेट अशा सर्व ठिकाणी निर्णयक आघाडी घेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. त्यामुळे जानेवारी २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्षपदी ते पुन्हा विराजमान होतील. त्यामुळे २०२५ हे साल आणि दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षाची ट्रम्प यांची धोरणदिशा काय असेल याची वाट पहावी लागेल. ट्रम्प ज्या पद्धतीने आक्रमक प्रचार करून यशस्वी झाले ती प्रचार पद्धती गेले दशकभर जगभर स्थिरावताना दिसते आहे आणि ट्रम्प यांच्या या विजयाने अधिक रूढ होऊ शकते.कारण जगभरच्या सत्ताधीशांना ती सोयीची वाटते आहे. मात्र त्या त्या देशातील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणूकीचे प्रश्न तीव्र पद्धतीने आकाराला येताना दिसत आहेत. त्यांना भिडताना सत्ताधीश कसे कौशल्य दाखवतात आणि लोक त्याला कसा प्रतिसाद देतात हे पहावे लागेल.तसेच भारत आणि अमेरिका यांचे परस्पर संबंध व भारताचे परराष्ट्र धोरण यातही काही बदल होतील का याकडेही लक्ष द्यावे लागेल. विद्यमान भारत सरकारला ट्रम्प यांची राजकीय धोरणे काही बाबतीत फायदेशीर ठरतील असे दिसत असले तरी काही आर्थिक धोरणे डोकेदुखी वाढवणारी ठरू शकतील. कारण ट्रम्प हे व्यापारी राजकारणी आहेत. त्यांच्याकडून धोरण सातत्याची अपेक्षा ठेवता येणार नाही उलट ते मनमानी पद्धतीचे धक्कातंत्री निर्णय घेऊ शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. " ट्रम्प यांचा दुसरा विजय " हा चर्चासत्राचा विषय होता.या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, प्रा. रमेश लवटे, दयानंद लिपारे, सचिन पाटोळे, रणजित यादव, राजेन्द्र मुठाणे, पांडूरंग पिसे, शकील मुल्ला, अशोक केसरकर तुकाराम अपराध, रामभाऊ ठीकणे, शहाजी धस्ते यांनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रातून असे मत पुढे आले, २०१६ मध्ये विजयी झालेले ट्रम्प २०२० मध्ये पराभूत झाले व पुन्हा २०२४ मध्ये विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयाने अमेरिकाअंतर्गत राजकारणाप्रमाणेच जागतिक राजकारणावरही काही मूलभूत परिणाम होणार आहेत. या निवडणुकीत निवडणूक पूर्व चाचण्यांचे अंदाज पूर्णतः चुकीचे ठरले. ट्रम्प यांच्या प्रचाराची पद्धत आणि पातळी यावर टीका होत होती. कारण या प्रचारात ठासून भरलेला वर्णद्वेष ,समाजात फूट पाडणारी भाषा, महिलांबाबत द्वेषमूलक दृष्टिकोन ,ट्रम्प यांचा पहिला कालखंड आणि त्यानंतर गेल्या चार वर्षात त्यांच्यावर झालेले आरोप आणि दाखल झालेले गुन्हे , त्यांच्यावर झालेला प्राणघातकक हल्ला हे एकीकडे होते. तर दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या गर्भपात व महिलांचे हक्क, स्त्री पुरुष समता,अमेरिकन राज्यघटना , वांशिक सलोखा, भूतदया आदी मुद्दे मांडत होत्या. मात्र त्याचवेळी गेल्या चार वर्षातील वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी आणि स्थलांतरितांचा वाढता प्रश्न हेही प्रश्न तीव्र होते. ट्रम्प यांनी या मुद्द्यांचा प्रचारात पुरेपूर उपयोग केला. तसेच एलॉन मस्क पासून आघाडीचे सर्व उद्योगपती ट्रम्प यांच्या बाजूने उभे होते.रिपब्लिकन की डेमोक्रॅटिक यापेक्षाही निवडणुकीचा प्रचार व त्याची पद्धत, त्याला येणारे यश अपयश, मतदारांना दाखवली जाणारी काल्पनिक भीती, उभा केलेला काल्पनिक शत्रू, जे आपल्या राजकीय बाजूचे नाहीत ते आपले पर्यायाने देशाचेही शत्रू, श्रीमंत व गरीब यांच्यातील वाढत जाणारी दरी या व अशा बाबींकडे जबाबदारीने पाहिले जाणार की नाही ? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या चर्चासत्रात अमेरिकेतील दोन्ही पक्षांच्या विचारधारा ,ट्रम्प यांचे व्यक्तिमत्व ,गेल्या दशकभरचे बदलते राजकारण, समकालीन जागतिक परिस्थिती आदी मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला.