प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ/ प्रतिनिधी:
शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांचा प्रचार पूर्ण ताकतीने करणार आहे. तसेच उद्या 29 ऑक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे यांनी केले.
शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ची कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची बैठक शिरोळ येथे पार पडली. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
रावसाहेब भिलवडे पुढे म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या महायुतीच्या कारभारावर जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐरणीवर असून महागाई, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांच्या सुखदुःखाशी महायुतीचे काही देणे घेणे नाही. केवळ घोषणा करायच्या आणि श्रेयवाद लाटायचे हीच भूमिका घेऊन काम केले जात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. राज्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर महाविकास आघाडीतील उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून देणे गरजेचे आहे. शिरोळ मधील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांचे शेती, सहकार, समाजकारण आणि राजकारणामध्ये अतिशय मोठे योगदान आहे. त्यांच्यासारखा अनुभव संपन्न नेता शिरोळ तालुक्याला मिळाला तर तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
गणपतराव पाटील यांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम काम करून तालुक्याच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.
श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, चंद्रकांत जाधव घुणकीकर यांनी मनोगतातून गणपतराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर आभार डी. पी. कदम यांनी मानले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बी. जी. माने, महिला तालुकाध्यक्ष सौ. स्नेहा देसाई, दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांच्यासह राजगोंडा पाटील, दिनेश कांबळे, शाहीर आवळे, विशाल जाधव, वीरेंद्र नांद्रेकर, संदीप मोरे, प्रशांत कदम, शुभम पाटील, नितीन चव्हाण, श्रेणिक कोगनोळे, तेजप्रतापसिंह माने यांच्यासह कार्यकारिणीतील सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.