राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर व जिल्ह्यातील इच्छुकांनी बुधवारी विधानसभेसाठी मुलाखती दिल्या.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  विधानसभा निवडणुकीचे तयारी जोरदारपणे सुरू झाली असून  पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षाला आठपैकी तीन ते चार जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. तरीही, पक्षाकडून शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी घेण्यात आल्या.पक्षाकडून या जागांसाठी मागील महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. त्यात ४१ अर्ज आले, तरी बुधवारी प्रत्यक्षात ४६ जणांनी मुलाखती दिल्या.

पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदींनी या मुलाखती घेतल्या. खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी सचिन दोडके, अनिता इंगळे, सोपान चव्हाण यांच्यासह 9 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यानंतर शिवाजीनगरमधून अ‍ॅड. नीलेश निकम, श्रीकांत पाटील, उदय महाले यांच्यासह 7, पर्वतीसाठी अश्विनी कदम, सचिन तावरे यांच्यासह 4, हडपसरमधून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बंडू गायकवाड यांच्यासह 4, वडगावशेरी 6, कोथरूड 2, पुणे कॅन्टोन्मेंट 4 आणि कसबा पेठेतून रवींद्र माळवदकर अशा एकूण 37 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.

या वेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, फौजिया खान, जयदेव गायकवाड, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात प्राथमिक चर्चेत राष्ट्रवादीला हडपसर, वडगावशेरी, खडकवासला तसेच पर्वती या जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी शिवसेनेकडून पर्वती आणि हडपसरची मागणी केली जात आहे.तसेच काॅंग्रेसकडूनही या दोन्ही जागा पक्षाला मिळाव्यात, असा आग्रह स्थानिक नेत्यांसह शहर काॅंग्रेसने केली आहे. तर शिवसेना नेत्यांकडून हडपसरसाठी थेट उमेदवाराचे नावच जाहीर करण्यात आले. तर, पर्वतीची जागाही काॅंग्रेसला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी इच्छुकांकडून “या मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकद आहे. या जागा आपल्याकडेच राहाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post