प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी काल पुण्यातील एका सभेत मतदानाची आकडेवारी देत वोट जिहाद विरुद्ध वोट महादेवने उत्तर देण्याचे विधान केले आहे. त्यातून त्यांच्या भ्रमिष्ट मानसिकतेचेच दर्शन झाले आहे अशी टीका प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड यांनी केली आहे.
समाजात विकृत धार्मिक तेढ पसरवण्याचा हा प्रकार तर आहेच, पण एका धर्माचे लोक मोठ्या प्रमाणावर मतदान करतात आणि दुसऱ्या धर्माचे लोक अगदी कमी प्रमाणात मतदान करतात अशी मल्लिनाथी करून त्यांनी वोट जिहादची जी थिअरी मांडली आहे ती तद्दन भंपक आणि भ्रमिष्टपणाची आहे असा दावाही छाजेड यांनी केला आहे.
या संदर्भात जारी केलेल्या एका पत्रकात अभय छाजेड यांनी म्हटले आहे की मतदानाचा विषय निरगुडकर यांनी कोरोना काळातील लस वितरण आणि लस उत्पादन या वेगळ्याच विषयापर्यंत नेऊन भिडवला आणि त्यातही त्यांनी खोटी माहिती देऊन संदर्भहीन टीका केली आहे. विरोधकांनी कोरोना लसीला विरोध करून लोकांना लस घेण्यापासून प्रवृत्त केले असा भंपक दावा संबंधित पत्रकारांनी करणे हे केवळ हास्यास्पदच नाही तर दुर्दैवी ही आहे असे त्यांनी म्हटले आहे. लस निर्मिती च्या संशोधनात 70 टक्के महिला संशोधक होत्या वगैरे संदर्भही निरगुडकर यांनी कालच्या कार्यक्रमात दिले. कशाचाच कशाला मेळ नसलेले त्यांचे हे वक्तव्य त्यांच्या निव्वळ भ्रमिष्ट प्रवृत्तीचे निदर्शक आहे असेही अभय छाजेड यांनी या पत्रकात नमूद केले आहे.