महापुरुषांचा अपमान करणारे व गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे वाचाळवीर आमदार चंद्रकांत पाटील म्हणजे सुसंस्कृत कोथरुडला लागलेले ग्रहण
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर... पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुणे हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा - समाजकारणाचा केंद्रबिंदू आहे आणि त्यात कोथरूड म्हणजे सुसंस्कृत, सुशिक्षित लोकांचे उपनगर! याच कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ अभिजीत हिंदुराव मोरे हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
याबाबत आज पत्रकार संघामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉ अभिजीत मोरे यांनी माहिती दिली की, "आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल व महाराष्ट्र राज्य प्रभारी गोपाल इटालिया यांनी आदेश दिला तर मी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे."
"सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाला असून प्रचंड भ्रष्टाचार माजला आहे. राजकारणाने अक्षरशः तळ गाठला आहे. सत्ताधाऱ्यांचे लक्ष केवळ सत्तेचा गोळा मटकवण्यामध्ये लागले असून सर्वसामान्य जनतेचे आरोग्य, शिक्षण, वाहतूक, वीज, पाणी, रोजगार, शेती, रस्ते, पायाभूत सुविधा यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. दिल्ली व पंजाब प्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे मुद्दे राजकारणाच्या केंद्रस्थानात आणण्यासाठी आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे", असे प्रतिपादन डॉ अभिजीत मोरे यांनी यावेळी केले.
यावेळी कोथरूडचे विद्यमान आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना डॉ मोरे म्हणाले की, "मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या व कोथरूडच्या विकास कामासाठी काहीच ठोस योगदान देता आलेले नाही. पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न अजून जास्त किचकट झाला आहे. शहरातील पी एम पी एम एल वाहतूक व्यवस्था सुधरवण्यामध्ये त्यांना अपयश आले आहे. त्यांनी जनतेऐवजी ठेकेदारांसाठी सत्ता राबवली. त्यामुळेच संपूर्ण पुणे शहरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असताना कोथरूडमध्ये स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचे नाटक करण्याची वेळ मंत्री चंद्रकांत पाटलांवर आली. शहरातील नदी, नाले, टेकड्या ओरबाडून बिल्डरांच्या घशात घालण्याचे भारतीय जनता पक्षाचे धोरण चंद्रकांत पाटील यांनी अजून जोराने सुरू ठेवले आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपद व काही काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद लाभलेले असून देखील चंद्रकांत पाटील हे पुण्यावर भार ठरलेले कृतीशून्य आमदार ठरले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांची संपूर्ण कारकीर्द ही त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनीच गाजलेली आहे. राज्यातील अनेक महापुरुषांचा अपमान करणारी वक्तव्ये त्यांनी वारंवार केली असून अशा या वाचाळवीर आमदारांना घरी बसवण्याची वेळ आली आहे".
"गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मग ते पुण्यातील ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण असो की गडगंज श्रीमंताच्या मुलाने बेदिक्कतपणे नशेत भरधाव गाडी चालवून निरापराध लोकांचा जीव घेणे असो की पुण्यातील टोळी युद्धातून होणाऱ्या हत्या असो की कोयता गॅंगने घातलेला उच्छाद असो. . . पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. अगदी पोलिसांवर हल्ले करण्याइतपत गुन्हेगारांची मजल गेली आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारांवर वचक ठेवण्याऐवजी आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील हे कुख्यात गँगस्टरांकडून सत्कार समारंभ करून घेत आहेत. गुंडांच्या कुटुंबीयांना स्वतःच्या भारतीय जनता पक्षामध्ये वाजत गाजत प्रवेश देत आहेत. अशा प्रकारे पुण्याचा बिहार करण्यामध्ये अतुल्य योगदान देणारे व 'लाडका गुन्हेगार' योजनेचे शिल्पकार आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांना आता पुण्यातून नारळ द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे 2019 ला कोल्हापूरहून आयात केलेला उमेदवार कोथरूडकर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निर्यात करतील, "अशी सडकून टीका डॉ मोरे यांनी केली.
"महापुरुषांचा अपमान करणारे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे वाचाळवीर आमदार चंद्रकांत पाटील म्हणजे सुसंस्कृत कोथरुडला लागलेले ग्रहण आहे. हे ग्रहण येत्या निवडणुकीमध्ये कोथरूडकरांनी सोडवावे", असे आवाहन यावेळी डॉ अभिजीत मोरे यांनी केले.