प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : विधानसभेच्या २८८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंळवारी (ता.३०) संपली. यावेळी सुमारे ११ हजार अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल झाले आहेत तर अनेक जागांवर महायुतीसह महाविकास आघाडीला बंडखोरीचा जोरदार फटका बसला आहे. तिसऱ्या आघाडीसह महाराष्ट्र नव निर्माण सेना, वंचित बहुजन आघाडीसह छोटे-छोट्या पक्षांना दंड थोपाटले आहेत. आता पर्यंत जाहीर केलेल्या यादीतून महायुती २८२ तर मविआकडून २८७ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर थेट ४७ ठिकाणी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना पहायला मिळणार आहे.
राज्यात विधानसभा जाहीर झाल्यापासून अनेकांनी उमेदवारीसाठी मिळवण्यासाठी कंबर कसून प्रयत्न केले होते यात काहींना यश आले तर काहींनी अपक्ष उभरावे लागले आहे. शेवटच्या दिवशी ४ हजार ९९६ उमेदवारांनी ६ हजार ४८४ अर्ज दाखल केले. यामुळे आतापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत . ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतरच विधानसभेच्या मैदानात किती उमेदवार असतील याचा खरा आकडा समोर येणार आहे. मतदान २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी करत शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरून आता महायुतीसह मविआचे नेते ४ तारखेपर्यंत बैठका घेऊन यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.