शिवाजीनगर भागातील होमी भाभा इस्पितळ तातडीने सुरू करण्याची आप ची मागणी.

 दिरंगाईला महापालिका विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :गेल्या पाच वर्षापासून बांधकाम सुरू असलेल्या मॉडेल कॉलनी शिवाजीनगर भागातील होमी भाभा प्रसुती गृह याचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आज आप तर्फे आयुक्त व आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तातडीच्या प्रसुती शस्त्रक्रिया विषयी अधिकारी गंभीर नसल्याने आप  कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला. गेल्या पाच वर्षात सुरुवातीच्या काळात निधी नसल्यामुळे भवन विभागातर्फे दिले जाणारे बांधकाम रखडले होते आणि आता लिफ्टच्या जागेचे बांधकाम चुकीचे झालेले असल्यामुळे अजूनही लिफ्ट बसवली गेलेली नाही. आता लिफ्ट ही बांधकामाच्या मापाप्रमाणे तयार करून घेणे भाग पडणार आहे. भवन विभाग, विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे अजूनही दोन मजले वापरात नाहीत. या दिरंगाई ला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आपने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

पुणे शहराची लोकसंख्या प्रचंड असूनही इमर्जन्सीच्या प्रसूतीच्या ऑपरेशनची सोय केवळ कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये असून बऱ्याचदा तिथे जागा मिळणे अशक्य असते. तातडीच्या प्रसूतीसाठी त्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये धाव घ्यावी लागते. गोखलेनगर, जनवाडी तसेच व पाटील इस्टेट, वैदुवाडी या सर्वच भागातील गरीब महिलांना हा अडचणीचा भाग ठरतो आहे. त्यामुळे तातडीच्या प्रसूतीसाठीच्या सोयीसुविधा भाभा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोठ्या लोकसंख्येच्या पुणे शहरासाठी तातडीच्या प्रसुती शस्त्रक्रियांसाठी केवळ एक हॉस्पिटल असणे ही पुणे शहरासाठी लाजिरवाणी बाब आहे. या भागातील माजी नगरसेवक,आमदार शिरोळे यांनी गेल्या पाच वर्षात या संदर्भात काहीही हालचाल केलेली नाही. दोन मजले अजूनही उपयोगात नसून तिथे पूर्ण सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी *आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत* यांनी केली आहे. यावेळी सोबत *आप चे सतीश यादव, अमोल मोरे, शंकर थोरात* आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post