पाण्याची बाटली दिली नसल्याने एकाचा डोक्यात दगड घालून खून.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- पाण्याची बाटली दिली नसल्याने  पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलाच्या मदतीने सतीश महादेव पाटील  (वय ४८, रा. स्टेशन रोडसमोर, हॉटेल राजपुरुषच्या मागे , कोल्हापूर) यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली.हा प्रकार रविवारी (दि. २७) रोजी रात्री  दीडच्या सुमारास रेल्वे स्टेशनसमोर कोरगावकर कंपौंड येथे घडली.

या घटनेची माहिती शाहुपुरी पोलिसांना समजताच घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात येऊन सदर मृतदेहाचा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

दरम्यान पोलिसांनी तातडीने या  गुन्ह्याचा तपास करून सराईत गुन्हेगार रोहन उर्फ चिक्या विजय गायकवाड (वय २४), सौरभ दीपक जाधव (२३, दोघे रा. कनाननगर, कोल्हापूर) यांना अटक केली, तर आणखी एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनसमोर राहणारे सतीश पाटील हे रविवारी मध्यरात्री कोरगावकर कंपौंड येथील राज ट्रेडिंग या दुकानासमोर बसले होते. दीडच्या सुमारास तिथे आलेला सौरभ जाधव याने सतीश यांच्याकडे पाण्याची बाटली मागितली. मात्र, सतीश यांनी पाण्याची बाटली न देता शिवीगाळ केली. पाच ते दहा मिनिटांत सौरभ हा आणखी दोन साथीदारांसह तिथे पोहोचला. शिवीगाळ करीत त्याने सतीश यांच्या डोक्यात दगड घातला. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघे हल्लेखोर निघून गेले.

सोमवारी सकाळी ओळखीतील वृत्तपत्र विक्रेत्या तरुणाला जखमी अवस्थेतील सतीश आढळताच त्याने याची माहिती जखमीच्या घरी दिली. नातेवाईकांनी तातडीने येऊन जखमीला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सतीश हे प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. या गुन्हयांची नोंद  शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

 - सीसीटीव्ही फुटेजवरून  खुनाचा छडा .

कोरगावकर कंपौंड येथील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी संशयितांचा छडा लावला. रोहन गायकवाड याला अटक करताच त्याने आणखी दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.

 - सराईतांकडून गुन्हा

अटकेतील जाधव आणि गायकवाड हे दोघेही सराईत गुन्हेगार असून  गायकवाड हा तीन महिन्यांपूर्वीच बाललैंगिक प्रतिबंधक गुन्ह्यातून बाहेर आला आहे.जाधव याच्यावरही गंभीर स्वरूपाचे  गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. तरीही सराईतांकडून गंभीर गुन्हे होत असल्याने पोलिसांच्या कारवाईवर  प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post