विधानसभा निवडणुकीत भाजपचे अंतर्गत राजकारण तापणार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची विविध पध्दतीने चाचपणी करत आहेत मंगळवारी भाजपकडून खडकवासला, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट मतदारसंघासाठी हे मतदान घेतले गेले. मात्र, पक्षांतर्गत मतदान मंगळवारी होणार असल्याची माहिती शहर पदाधिकाऱ्यांना सोमवारी दुपारी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. मात्र, या बैठकीस दांडी मारलेल्या अनेक इच्छुकांना याबाबत कल्पनाच नव्हती. त्यामुळे याचे पडसाद निवडणूक प्रक्रियेत उमटले.

गेल्या दोन महिन्यांपासूनच शहरात विधानसभेचे चांगलेच वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवार आपण अमुक मतदारसंघातून इच्छुक असल्याचे जाहिरातींद्वारे दाखवून देत आहेत. मात्र, भाजपमध्ये विधानसभेला इच्छुक झाल्यापासून काही मतदारसंघांत विद्यमान आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तिकीट कोणाला मिळणार यापेक्षा इच्छुकांच्या दगाफटक्याने जागा जाणार की काय, अशी परिस्थिती सध्या भाजपमध्ये आहे. शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उमेदवारी कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्ष घेणार असला तरी सध्या विद्यमान आमदार आणि इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे अंतर्गत राजकारण  तापणार अशी चर्चा सुरू आहे.


Post a Comment

Previous Post Next Post