खंडणी प्रकरणातील ग्रामपंचायत सदस्यासह आणखी तिघां जणांना अटक , तोतया पत्रकारासह दोघांचा शोध चालू.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर-लक्ष्मीपुरी येथील प्लॉस्टिक पत्रावळी, द्रोण विक्रेत्यास धमकावून तीन लाख रुपयांची खंडणी वसुल करून आणखी पाच लाख रुपये मागणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अगोदर दोघांना अटक झाली होती. रविवारी ग्रामपंचायत सदस्यासह अन्य तिघांना पोलीसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघा मुख्य सुत्रधारांचा शोध सुरू असून लवकरच ते जेरबंद होतील असे लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.


 यातील संशयीत गडमुडशिंगीचा ग्रामपंचायत सदस्य असलेला दिलीप भाऊ थोरात (वय ५० रा. गडमुडशिंगी ता.करवीर), सुशांत बाबुराव बोरगे (वय ४० रा.मंगळवार पेठ), मोहसिन सलीम मुल्ला (वय ३७ रा. शिवाजी चौक परिसर) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. शनिवारी रात्री अटक करून त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले होते. तोतया पत्रकार अन्सार मुल्ला व त्याच्या अन्य साथीदारांनी सोमवार,७ ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीपुरी येथील व्यापाऱ्याच्या दुकानात धाड टाकून दुकान बंद करण्याची धमकी दिली. तसेच पाच लाख रुपयांची मागणी करून तीन लाख रुपये वसुल केले. दुसऱ्या दिवशी कथित सामाजिक कार्यकर्त्यांसह मुल्ला त्या व्यापाऱ्याकडे गेला आणि पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. संतप्त दुकानदार सनी दर्डा यांनी लक्ष्मीपुरी पोलीसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अजित पवार, मयुर कांदळकर या दोघांना पहिल्या दिवशी अटक झाली होती. अन्य तिघे शनिवारी सापडले. इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी दोन पथके तैनात केली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post