प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे:
कोल्हापूर- लक्ष्मीपुरी येथील प्लॉस्टिकचे द्रोण,पत्रावळ्या विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला धमकी देऊन तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या पाच जणांना लक्ष्मीपुरी पोलीसांनी अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केले होते. मात्र न्यायाधिशांनी ते फेटाळले आहेत. त्यामुळे खंडणीखोरांची दिवाळी कारागृहातच साजरी होणार. दरम्यान,अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेल्या तिघांच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
७ ऑक्टोंबर रोजी तोतया पत्रकार अन्सार मुल्ला व त्याच्या सहकाऱ्यांनी प्लॉस्टिक व्यापारी सनी दर्डा यांच्याकडून तीन लाख रुपयांची खंडणी उकळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८ ऑक्टोंबर रोजी एका सामाजिक कार्यकर्त्यांने इतर साधीदारांनी त्याच दुकानात जाऊन पाच लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी दर्डा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सहा जणांना अटक केली आहेत. अटकेतील सर्वजण कारागृहात आहेत.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केलेले अजित पवार, मोहसीन मुल्ला, मयूर उर्फ गणेश कांदळकर, दिलीप थोरात आणि सुशांत बोरगे यांची दिवाळीपूर्वी जामीन मिळवण्याची धडपड सुरू होती. मात्र, पोलिसांनी संशयितांच्या जामिनाला विरोध केल्याने न्यायाधीशांनी जामीन अर्ज फेटाळला. पुढील सुनावणी ५ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे संशयित खंडणीखोरांची दिवाळी कारागृहातच होणार आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी तोतया पत्रकार अन्सार मुल्ला, शशिकांत कुंभार, सागर चौगुले यांच्यासह इतरांचा शोध सुरूच असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.