प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -देवीची विविध रुपं, विविध क्षेत्रांचं प्रतिबिंब दर्शविणारे पोशाख, पारंपरिक वेशभुषा परिधान केलेल्या महिलांनी "नवदुर्गा बाईक रॅली" च्या माध्यमातून नारी शक्तीचे दर्शन घडवले. बेटी बचाओ बेटी पढाओ, मुली आणि महिलांचे संरक्षण झालेच पाहिजे, महिला पत्रकारांचे संरक्षण झालेच पाहिजे यासह अनेक सामाजिक संदेश शाही दसरा महोत्सवातील या रॅली दरम्यान देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅली मार्गस्थ झाली.
महिलांच्या शोभायात्रेत स्त्रीशक्तीचा जागर झाला. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 350 पेक्षा जास्त महिलांनी आज कोल्हापूरकर आणि जिल्ह्यात आलेल्या भाविक व पर्यटकांना सामाजिक संदेश देत आम्हीही कुठे कमी नाही असा जणू संदेशच दिला. सकाळी 9 वाजता दसरा चौकातून शोभायात्रेला सुरुवात झाली. पुढे बिंदू चौक, शिवाजी चौक, भवानी मंडप, उमा टॉकीज, रेल्वे पूल, कावळा नाका ते दसरा चौक असा रॅलीचा प्रवास झाला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, तहसीलदार सैपन नदाफ, नायब तहसिलदार नितीन धापसे पाटील, माहिती अधिकारी वृषाली पाटील, ॲड. सुप्रिया दळवी, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर, उदय गायकवाड यांनी रॅली चे नियोजन केले.
पारंपरिक पोशाखातून शाही संस्कृतीचे दर्शन, नवदुर्गांच्या पेहरावातून स्त्रीशक्तीचे रुप, काळ्या कोटातील न्यायदेवतेचे अस्तित्व, कपाळाला मळवट भरलेली श्री अंबाबाई, दुचाकीवरुन निघालेली वाहतूक विभागातील नारी शक्ती आणि पोलीस भगिनी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत प्रेस क्लब च्या महिला पत्रकारांच्या सहभागाने आज महिलांची नवदुर्गा बाईक रॅली संपन्न झाली. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी या रॅली व्दारे आपापल्या क्षेत्रातील कामाचे संदेश रुपात सादरीकरण केले.
महिला पत्रकार, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वकिल, निर्भया पथक, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, करवीर तहसिल कार्यालय, सामाजिक क्षेत्र, व्यावसायिका, माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षिका, बचत गटाच्या सदस्या, अग्निशमन दलात काम करणाऱ्या महिला, विद्यार्थिनींसह लगोरी फाउंडेशन गट, करवीर निवासिनी, महिला रिक्षा चालक गटा बरोबरच अन्य महिला विविध गटांसह रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. समाजात घडत असलेल्या अनेक घटनांचे समाज उपदेशक संदेश या रॅलीमध्ये महिलांनी दिले. अनेक क्षेत्रातील महिलांनी रॅलीत सहभाग नोंदवून शाही दसरा महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.