अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी 31 ऑक्टोबर अखेर पूर्ण करा - जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 1 :  सर्व शिधावाटप दुकानामध्ये ई-पॉस मशीनवर आधार प्रमाणिकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिधापत्रिका सोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकामध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी आधार प्रमाणिकरण (ई- केवायसी) होणे आवश्यक आहे. त्याआधारे शिधापत्रिकेमध्ये योग्य व्यक्ती असल्याची खात्री होईल. अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी धान्य घेतेवेळी कुटुंबातील सर्व सदस्यांसह नजिकच्या रास्तभाव दुकानात जावून दिनांक 31 ऑक्टोबर 2024 अखेर आपले आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.


जिल्ह्यात अन्नसुरक्षा लाभार्थी योजनेअंतर्गत 5 लाख 88 हजार 606 शिधापत्रिका असून 24 लाख 96 हजार 273 लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यामध्ये प्रतिमाह सरासरी 95 टक्के धान्य उचल होत असून सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आले आहेत. तथापि काही शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) अत्यल्प असून अद्यापही 22 लाख 45 हजार 426 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. शासन स्तरावरुन आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देश प्राप्त झाले असून सर्व शिधावाटप दुकानामध्ये ई-पॉस मशीनवर आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 


सर्व रास्तभाव दुकानामध्ये आधार प्रमाणीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणिकरण करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही, तसेच कोणत्याही रास्तभाव धान्य दुकानातुन आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) करता येणार आहे. आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) न केल्यास भविष्यामध्ये अन्नसुरक्षा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याचेही श्रीमती चव्हाण यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post