खंडणी प्रकरणातील संशयीत तोतया पत्रकारासह आणखी सहा जणांची नावे निष्पन्न. , अन्सार मुल्लासह सागर चौगलेचा शोध चालू.

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- लक्ष्मीपुरी येथील प्लॉस्टिक विक्रेत्याच्या दुकानात छापा टाकून तीन लाख रुपयांची खंडणी उकळणारा तोतया पत्रकार अन्सार मुल्ला याच्यासह १६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे. उर्वरीत सहा नावे बुधवारी निष्पन्न झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान खंडणीतील रक्कम अन्सार मुल्ला  याने त्याच दिवशी वाटून घेतल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे. अन्सार मुल्ला आणि  वृत्तवाहिनीचा व्हिडीओग्राफर  सागर चौगले या दोघांचा  पोलीस शोध घेत आहेत.

७ ऑक्टोंबर,२०२४ रोजी अन्सार मुल्ला आणि त्यांच्या साथीदारांनी  लक्ष्मीपुरी येथील सनी दर्डा यांच्या प्लॉस्टिक द्रोण, पत्रावळ्याच्या दुकानात छापा टाकून बातमी प्रसिध्द करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागितली. दर्डा यांनी घाबरून तीन लाख रुपये दिले. तोतया पत्रकार अन्सार मुल्ला याने हे पैसे त्याच दिवशी आपल्या सर्व सहकाऱ्यांमध्ये वाटून घेतल्याची शक्यता आहे.

   तसेच या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलीसांनी यात सामील असलेल्या  संशयीत आरोपींची नावे निष्पन्न केली आहेत. यामध्ये किशोर भिकाजी कांबळे (रा. गडमुडशिंगी ता. करवीर), शशिकांत कुंभार, रहिम पिंजारी, जावेद देवडी, सुभाष कांबळे, अजय सोनुर्ले यांचा समावेश आहे. लक्ष्मीपुरी पोलीस लवकरच त्यांना  ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान या गुन्हयातील मुख्य सुत्रधार अन्सार मुल्ला व एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओग्राफर सागर चौगले यांचा पोलीस शोध घेत आहेत. पण ते त्यांच्या राहत्या घरी आलेले नाहीत. कार्यालयातही ते कामावर गेलेले नाहीत. अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पत्रकारांना दिली.

अटकपूर्व जामीनासाठी संशयीताची धावपळ.

संशयीत सागर चौगले व अन्सार मुल्ला या दोघांचे नातेवाईक अटकपूर्व जामीन घेण्यासाठी शहरातील एका नामवंत वकीलाच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यांच्या मोबाईलवरून लोकेशन काढण्याचे काम सुरु आहे. पण मोबाईल बंद असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलीस नातेवाईकांकडेही चौकशी करीत आहेत.

--------

पोलिसांच्या सुचनेवर श्वानांच्या कसरती.शुक्रवारी समारोप.



कोल्हापूर-कोणत्याही गुन्ह्यांचा  तपास करण्यासाठी पोलिसांना तांत्रिक साधनांसोबत श्वान पथकांची मोठ्या प्रमाणात मदत होत असते. प्रशिक्षित श्वान कशा प्रकारे कामगिरी करतात, सुचनांचे पालन कसे केले जाते, हे पोलीस कर्तव्य मेळावात दाखवले जाते. बुधवारी अलंकार हॉल येथे मेळाव्याला प्रारंभ झाला. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.

मेळाव्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटनानंतर झालेल्या श्वान पथकांच्या स्पर्धेत श्वानांनी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कसरती करून त्यांचे कौशल्य दाखवले. परिक्षेत्रातील स्पर्धकांच्या १९ व्या पोलिस कर्तव्य मेळाव्याला बुधवारी प्रारंभ झाला. शुक्रवारी मेळाव्याची सांगता होणार आहे.

    तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यानंतर फिर्याद दाखल करून घेण्यापासून ते घटनास्थळाचा पंचनामा, पुराव्यांचा शोध, योग्य दिशेने गुन्ह्यांचा तपास करणे, तातडीने आरोपींना पकडणे, त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करणे, आरोपपत्र दाखल करण्याच्या कामात पोलिस विविध घटकांचा समावेश असतो. श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, ठसे तज्ञ, संगणक तज्ञ यांना अद्ययावत ज्ञान असावे यासाठी पोलिस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार मेळाव्याची सुरुवात झाली.

स्पर्धेचा समारोप शुक्रवार, दि. १८ रोजी सायंकाळी होणार आहे. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक प्रिया पाटील (गृह), सुजितकुमार क्षीरसागर, आप्पासो पवार, निरीक्षक रवींद्र कळमकर, आदी अधिकारी हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post