प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.com
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारण, सहकार ,परिवर्तन अशा सर्व क्षेत्रांमध्ये सहा दशकाहून अधिक काळ अतिशय तळमळीने कार्यरत राहिलेल्या कालवश श्रीपतराव शिंदे उर्फ नाना यांचा १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पहिला स्मृतिदिन आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व मी कधी जवळून तर कधी दुरून गेली ४० वर्षे सतत पाहत आलो आहे. १९८५ साली मी समाजवादी प्रबोधिनीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून वयाच्या ऐन विशीमध्ये कालवश आचार्य शांतारामबापू गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली. त्यावेळी सुरुवातीपासूनच प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य असलेले कालवश एन डी पाटील, ऍड .गोविंदराव पानसरे, प्राचार्य म.द.देशपांडे, प्राचार्य ए. ए.पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांशी सख्य जमले आणि ते अखेरपर्यंत राहिले. नानांबाबत ही तसेच झाले.
मी समाजवादी प्रबोधिनीचे काम करण्याचा काळ आणि श्रीपतराव शिंदे आमदार म्हणून निवडून येण्याचा काळ एकच होता. ते आमदार झाल्यावर प्रबोधिनीत शांताराम बापूंना आवर्जून भेटायला आलेले होते. त्यानंतर कार्यक्रमांच्या निमित्ताने ते अनेकदा येत राहिले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या , सभा संमेलनाच्या निमित्ताने आम्ही बाहेरगावीही भेटत राहिलो. देवदासी प्रथा निर्मूलन ,पूरग्रस्त, धरणग्रस्त, अंगणवाडी सेविका ,कामगार संघटना आदी विविध क्षेत्रातील त्यांचे काम वृत्तपत्रातूनही वाचायला मिळत असे. तसेच प्रत्यक्ष पाहायलाही मिळत असे. नाना जन्मले ते स्वातंत्र्य आंदोलनाचे बाळकडू घेऊन.ते दहा वर्षाचे असताना भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर भारताची उभारणी हे पहात पहात ते मोठे होत होते. त्यामुळे त्यांच्यासारखा संवेदनशील तरुण राष्ट्रसेवा दलाशी जोडणे जाणे क्रमप्राप्त होते. ते विद्यार्थी दशेतच राष्ट्रसेवा दलाशी जोडले गेले. वकील झाले. आणीबाणी तुरुंगवास पत्करला. कार्यकर्ता ,नेता ,आमदार झाले.शेकडो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी उभे केले. सार्वजनिक जीवनात आणि स्थानिक स्वराज्य संस्थात त्यांनी अनेक सर्वसामान्य माणसे पेरली. सहकारातून समाजवाद रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विधानसभेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला. समाजासाठी लढणारा खरा समाजवादी ही त्यांची अखंड ओळख होती.
जनता दलासारखा पक्ष राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर कमजोर होत चाललेला असताना आपल्या परिसरात मात्र तो मध्यप्रवाहात सातत्याने ठेवण्याचे फार मोठे काम नानांनी केले. ती त्यांची विचारांची बांधिलकी आणि नेतृत्वाची यशस्विता फार महत्त्वाची आहे. त्यांची जेष्ठता त्यांच्याशी संवाद करताना आड येत नव्हती. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विशेष पैलू होता.अतिशय स्पष्टवक्ते आणि रांगडे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला. प्रबोधिनीमुळेच मला विविध क्षेत्रातील , पक्षातील अनेक मान्यवरांचा जवळून स्नेह लाभला. श्रीपतराव शिंदे उर्फ नाना ज्या समाजवादी विचारधारेचे होते त्या विचार परंपरेतील ग.प्र.प्रधान, भाई वैद्य, सदानंद वर्दे, सुधाताई वर्दे,मृणालताई गोरे अशा अनेक मान्यवरांशी माझा व्यक्तिगत परिचयही होता. मात्र समाजवादी विचार परंपरेतील श्रीपतराव शिंदे उर्फ नाना यांच्याशी माझ्या होणाऱ्या चर्चा व भेटी यांचे प्रमाण कैक पटींनी अधिक होते.
समाजवाद ही मानवी समाज जीवनाच्या विकासक्रमातील एक प्रगत अशी अवस्था आहे. नव्या भारताच्या उभारणीचे ते महत्त्वाचे मूल्य आहे. सामाजिक न्यायाच्या पायावर समाजाची उभारणी झाली पाहिजे. त्याशिवाय मानवी जीवन सुखी आणि सुरक्षित बनणार नाही. हे समाजवादाच्या संकल्पनेतील गृहीततत्व नाना आपल्या राजकीय ,सामाजिक जीवनात जपत आले. समाजवादाच्या उद्दिष्टाने सतत सहा दशकांहून अधिक काळ यश-अपयशाची तमा न बाळगता कार्यरत राहणे हे काम सोपे नसते. पण नाना ते सतत करत राहिले. आजच्या सर्वांगीण अस्वस्थ वर्तमानात, संविधानाच्या प्रत्येक मूल्यावर पद्धतशीरपणे हल्ले होत असताना नानांनी राजकारण ,सहकार ,शिक्षण अशा विविध क्षेत्रात जे मूलभूत स्वरूपाचे काम केले ते फार महत्त्वाचे ठरते. ते पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे.
समाजवादी प्रबोधिनीतील १९८५ च्या पहिल्याच भेटीत एक तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांनी माझी केलेली चौकशी व त्यापुढे सातत्याने प्रबोधिनीचा एक कार्यकर्ता लेखक, वक्ता ,संपादक, संघटक अशा अनेक अंगांनी घेतलेली दखल व अनेकदा केलेले कौतुक मला नेहमीच प्रेरणादायी वाटत आले आहे. डाव्या समाजवादी चळवळीतला एक लोकप्रतिनिधी आणि पूर्णतः कार्यकर्त्याचा पिंड असलेला बुलंद नेता ही त्यांची प्रतिमा सातत्याने माझ्या आदराचा विषय होती. भेट झाल्यावर त्यांच्याशी राजकिय , सामजिक विषयांवर बोलणे व्हायचेच. त्याच्या असंख्य आठवणी गेले वर्षभर पुन्हा पुन्हा वर येत आहेत. नानांचे ग्रंथ प्रेम मोठे होते. अनेक सभा संमेलनांमध्ये सभागृहाच्या बाहेर त्यांना मी पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तके चाळत असताना आणि ती विकत घेत असताना सातत्याने पाहत आलो होतो .स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या हातात विकत घेतलेली पुस्तके घेऊन ती गाडीत ठेवतानाची त्यांची अनेकदा पाहिलेली छबी माझ्या कायमची स्मरणात आहे. ते अतिशय चांगले वाचक होते हे त्यांच्या भाषणातून व संभाषणातून सहजपणे जाणवायचे .समाजवादी प्रबोधिनीच्या ' प्रबोधन प्रकाशन ज्योती 'या मासिकाचे ते अगदी पहिल्या अंकापासून म्हणजे जानेवारी १९९० पासूनचे वाचक होते.
२०२२ साली मला भाई माधवराव बागल विद्यापीठाचा भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाल्यानंतर नानांनी माझे फोन करून अभिनंदन केले होते.तसेच त्या फोनवर आमच्या बऱ्याच गप्पाही झाल्या. त्यानंतर कोल्हापुरात एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाल्यानंतर पुन्हा ते माझ्या पूर्ण झोकून देऊन काम करण्याबद्दल आणि शांतारामबापू कालवश झाल्यानंतर गेली दहा-बारा वर्षे तू ज्या पद्धतीने समाजवादी प्रबोधिनीचे काम विस्तारित ठेवतो आहेस याचे मला मोठे कौतुक वाटते असे म्हणाले होते. आणि इतरही बरेच बोलले होते.ते शब्द आणि शब्द आजही मला प्रेरणा देत असतात. कारण समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात सहा दशकाहून अधिक काळ काम करून तावूनसुलाखून निघालेल्या एका धडाडीच्या नेत्याचे ते शब्द होते. त्यानंतर त्याच पद्धतीने त्यांच्याशी अखेरचे सविस्तर बोलणे झाले ते इचलकरंजीत. येथील जनता दलाचे ज्येष्ठ नेते व माझे स्नेही सदाशिवराव उर्फ सदा लोकरे कालवश झाले त्या दिवशी. १६ जून २०२२ हा तो दिवस होता.
त्यानंतर नानांशी एक-दोन भेटी झाल्या. पण ज्याला बोलणे म्हणता येईल असे बोलणे झाले नाही. आणि अखेर १४ ऑक्टोबर २०२३ रोजी ते कालवश झाले. नाना आजारी असल्याचे गडहिंग्लजमधील समाजवादी प्रबोधिनीच्या सहकाऱ्यांकडून समजले होते. पुण्यात दवाखान्यात उपचार घेत असलेले नाना बरे होऊन घरी आले की घरी जाऊन भेटू असे मी ठरवले होते. पण मला त्यांना अखेरचे भेटता आले नाही याची खंत मोठी आहे. अखेर नानांच्या पश्चात स्वातीताई आणि सर्व कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी जावे लागले. आणि गडहिंग्लजमध्ये शोकसभेत बोलावे लागले.श्रीपतराव शिंदे उर्फ नाना यांच्यासारखा दिग्गज माणूस ज्यावेळी कालवश होतो त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयां इतकीच फार मोठी सामाजिक हानीही होत असते. त्यांनी आयुष्यभर जपलेली विचारधारा, केलेले काम सामूहिकपणे अधिक वृद्धिंगत करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. डाव्या, समाजवादी, प्रबोधनकारी, परिवर्तनवादी, विवेकवादी विचार अशी बांधिलकी असलेल्या आपल्या प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारी आहे असे मी मानतो. आणि त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)