जगजीतसिंग :गझल गायकीचा शहेनशहा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com


१० ऑक्टोबर हा ख्यातनाम गझल गायक  जगजीतसिंग यांचा स्मृतिदिन.जगजीतसिंग नावाच्या जदुभऱ्या आवाजाने साडेतीन-चार दशके गझल रसिकांना भरभरून दिल. आज त्यांच्या मृत्यूला तेरा वर्षे होऊन गेल्यावरही ती जादू कायम आहे आणि पुढेही राहील यात शंका नाही. त्यांनी गझलेकडे नव्या रसिकांना आकर्षित केलं. पन्नासावर अल्बम आणि हजारो कार्यक्रमानी जगभर त्यांनी गझल पोहोचवली. २००३ साली पद्मभूषण ही उपाधी केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या अजरामर कार्यामुळे बहाल केलेली होती. तसेच राजस्थान रत्न ,इंडियन टेली पुरस्कार ,गालिब अकॅडमी पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. कुरुक्षेत्र विद्यापीठाने त्यांना डी लीट ने सन्मानित केले होते. त्यांनी आपल्या जीवनात आपल्या गायन व संगीत कलेच्या माध्यमातून समाजाला एवढ भरभरून दिलं आहे की ते तृप्त होते. म्हणून तर आपल्या अखेरच्या मुलाखतीत ते म्हणाले होते ,'मी खुश आहे.मी जीवनाचा मनमुराद आनंद लुटला आणि लुटलो आहे.'

जगजीत सिंह यांनी अनेक भाषांमध्ये गायन केले. लोकजीवनाशी एकरूप असलेल्या रचनांना त्यांनी स्वरबद्ध केले आणि संगीतही दिले.

उर्दू गझलच्या कठीण शब्दांनाही त्यांनी लोकांना सहज अर्थ कळवा अशा कलात्मक पद्धतीने सादर केले. गझल कशी ऐकावी  ? हे त्यांनी लोकांना शिकवलं.कला निर्मितीचा प्रत्येक क्षण कलावंताच्या दृष्टीने उत्सवाचा असतो. हा उत्सव सातत्याने साजरा करण्यात राहण्याची संधी या महान कलावंतला मिळाली.


होटो से छू लो तुम ,मेरा गीत अमर कर दो 

बन जाओ मीत मेरे , मेरी प्रीत अमर कर दो...


 असं गाणारा हा कलावंत सहजपणाने असेही गात होता ,


गम  का खजाना  तेरा भी है ,मेरा भी है 

ये नजराना तेरा भी है, मेरा भी है.....


गझलचा शहेनशहा मिर्झा गालिब  पासून बशीर बद्र यांच्यापर्यंत अनेक महान शायरांच्या गझला आपला स्वरसाज देऊन जगजीतसिंगानी शब्दश :अमर करून ठेवल्या.आपल्या उत्तम गझला उत्तम आवाजात रसिकांपर्यंत जायला हव्यात असं प्रत्येक गझलकाराला वाटत असतं. अर्थात फार कमी रचनाकारांना असं सौख्य  प्राप्त होतं.

जगजीत सिंगानी अशा अनेक नामवंत व नवोदित गझलकारांना अधिक नामवंत केलं. ' गझल ही शब्दप्रधान गायकी आहे 'हे जगजीतसिंगाच्या गायकीने उर्दू आणि हिंदीला चांगले पद्धतीने समजावून दिले.


मुझसे बिछडके खुश रहते हो 

 मेरी तरह तुम भी झूठे हो...


यासारख्या गझला ऐकाव्यात फक्त आणि फक्त जगजीतसिंग यांच्याच आवाजात. ख्यातनाम शायर निदा फाजली एकदा म्हणाले होते,' जगजीत सिंग यांच्या आवाजात आईच्या गोडवा आहे, वडिलांच्या अथांग प्रेमाचे सौंदर्य आहे, प्रेमाच्या गाढ नात्यातील कोमलपण आहे.' गझल हा लिहायला अतिशय अवघड पण लोकप्रिय काव्यप्रकार आहे. गझलेची भाषा कोणतीही असली तरी तिचा आकृतीबंध आणि इतर बंधने तिच्यापासून दूर होऊ शकत नाहीत.हे तिचे वेगळेपणच गझल गायकांनाही प्रयोगशील बनवत असते. जगजीतसिंगानी गझल गायकीत अनेक प्रयोग रुढ केले. याचे श्रेय जेवढे त्यांच्यातील कलावंताला आहे तेवढेच त्या शब्दप्रभू  गझलकारांनाही आहे.


ये जो  जिंदगी की किताब है ,किताब भी क्या किताब है 

कही इक हसीनसा ख्वाब है ,  कही जानलेवा अजाब है ....


किंवा


हाथ छुटे तो भी रिश्ते नही छोडा करते 

वक्त की शाख से लम्हे नही तोडा करते...


यासारख्या रचनांमध्ये गझलकाराच्या शब्दाची प्रचंड  हुकमत आहे.या हुकमी शब्दांना जगजीतसिंगांसारखा सुरेल स्वर्गीय आवाज लाभला तर रसिकांना पर्वणीच ठरते. कलाकाराला पोटाला लागणारे  अन्नापेक्षा त्याच्या कलाकृतीला मिळालेली दाद फार महत्त्वाची वाटत असते. जगजीतसिंह यांना अशी दाद जगभर मिळत राहीली.


८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानातील श्रीगंगानगर येथे एका कुटुंबात जगजीतसिंग जन्मले. वडील सरदार अमनसिंह धिमन आणि आई बच्चन कौर यांनी त्यांचं चांगल पालन पोषण केले. गंगानगर च्या खालसा हायस्कूलमध्ये व शासकीय महाविद्यालयाचे शिकले. जालंदरच्या डीएव्ही कॉलेजमधून कला शाखेची पदवी त्यांनी घेतली.

आपल्या मुलाने भरपूर शिकून सरकारी नोकरी करावी अशा त्यांची इच्छा होती.पण जगजीतसिंगांचा गाण्याकडे ओढा होता. जालिंदर आकाशवाणीवर त्यांनी गायक व संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यांनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण सुरू केलं. दृष्टीही असलेले  अव्वल पंडित छगनलाल शर्मा, मैहर घराण्याचे उस्ताद जमाल खान यांच्याकडे ते शिकले. ख्याल, धृपद,ठुमरी आदि सर्व प्रकारच्या शास्त्रीय प्रकारात ते प्रवीण झाले.हळूहळू ते स्वतः चालीही लावू लागले. त्या गझला, गीते, रसिकांना आवडू लागल्या.चित्रा दत्ता यांच्याशी १९६९ साली विवाहबद्ध झाल्यावर त्यांचे सांगीतिक जीवन बहरू लागलं. अखेरपर्यंत गझल गायकीतला कोहिनूर म्हणून जगजीतसिंग वावरले. अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.गीते, भजनेही गायली. दूरदर्शन वरील मालिकांची शीर्षक गीते गायली व संगीतबद्ध केली. ती लोकप्रिय झाली. पण जगजीत सिंग म्हणजे गझल हे समीकरण कमालीचे लोकप्रिय झालं. प्रेम, गीत, अर्थ , साथ साथ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.


झुकी झुकी सी नजर बेकरार है की नही, होशवालों को क्या खबर, बेखुदी क्या चीज है, होटो से छू लो तुम, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, अपने होटोपे सजाना चाहता हु, मैं ना हिंदू ना मुस्लिम मुझे जीने दो, मै भूल जाऊ तुम्हे अब यही मनासिब है, शाम से आख में नमी सी है, तेरे आने की जब खबर मेहके, तेरा चेहरा कितना सुहाना लगता है, ये दौलत भी लेलो ये  शोहरत भी लेलो, झुकी झुकी सी नजर, तुमको देखा तो ये खयाल आया, या तो मिट जाये या मिटा दीजिए, वो कागज की कस्ती यासारख्या शेकडो गझला त्यांना अमर ठेवणाऱ्या आहेत. गुलजार, जावेद अख्तर यांच्यासह त्यांनी केलेले काम फारच भव्य आहे. 'मिर्झा गालिब 'या दूरदर्शनच्या मालिकेसाठी जगजीतसिंगानी संगीत व आवाजाने ज्या पद्धतीने गालिबना सादर केले तो तर अनमोल ठेवाच आहे. खुद्द गालिबही त्यावर 'वाह वाह क्या बात है 'म्हणून गेला असता. 

या थोर कलावंताला आपल्या तरूण मुलांचा अपघाती मृत्यू सहन करावा लागला. अखेरच्या काळात त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने ग्रासले होते. १९९८  व  २००७ मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया ही झालेली होती. त्यांनी आपल्या गायनाच्या कार्यक्रमातून अनेक सामाजिक संस्थांना फार मोठी मदत मिळवून दिलेली होती.

जगजीतसिंगानी गझलेचा, कवितेचा आनंद उधळण्यात आपला घसा कोरडा ठेवला नाही. ते गात राहिले... स्वतःला उधळत राहिले.' गझलेचा प्रियकर होणे हे साधे सोपे नसते, एकेका शेरा साठी मी रक्त अटवले होते 'हे त्यांनाही माहीत होते. आपल्याला खऱ्या अर्थाने साथ देणाऱ्या सर्वांबद्दल ते कमालीचे कृतज्ञ होते. आपल्या ऐन उमेदित पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी एक गीत गायलेलं होतं. त्याचे बोल होते,

रात खामोश है ,चांद मदहोश है 

थाम लेना मुझे, जा रहा होश है ....

अखेर मेंदूच्या रक्तस्त्रावान त्यांचा होश गेला हे खरं. पण त्यांचा आवाज आपल्याला गझलप्रेमाचा चिरंतन जोश देत राहील यात शंका नाही.अस्सल कलावंत कलेच्या रूपात कायमच चिरंजीव असतात. जगजितसिंग हे असे चिरंजीव कलावंत आहेत.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post