डॉ.तारा भवाळकर : लोकसंस्कृतीच माहेरघर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.com

भारताची राजधानी नवी दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या ९८  व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.तारा भवाळकर यांची निवड होणे ही आपणा सगळ्यांच्याच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या  गेल्या ९७ संमेलनांमध्ये  केवळ पाच महिला संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत. कुसुमावती देशपांडे ( १९६१ ग्वाल्हेर),दुर्गा भागवत (१९७५  कराड )शांता शेळके(१९९६ आळंदी ) विजया राजाध्यक्ष( २००१ इंदूर ) डॉ.अरुणा ढेरे( २०१९ यवतमाळ) यांच्यानंतर आता २०२५ च्या संमेलनाच्या ताराबाई अध्यक्ष होत आहेत. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर होणारे पहिले संमेलन भारताच्या राजधानीत होत आहे.या पार्श्वभूमीवर ताराबाईंच्या अध्यक्षपदाचे महत्त्व अधिक सोनेरी होते. वास्तविक हा सन्मान ताराबाईंना काही वर्षांपूर्वीच मिळायला हवा होता पण तरीही ' देर आये लेकिन दुरुस्त आये ' म्हणी प्रमाणे त्यांना अध्यक्षपद मिळाले याचे महत्त्व मोठे आहे. ताराबाईंच्या नावाची घोषणा करताना अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे म्हणाल्या, डॉ.भावाळकरांचे योगदान आजवर काहीसे दुर्लक्षित होते अशी आमची भावना आहे. यानिमित्ताने त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सन्मान होत आहे. ' साहित्य महामंडळ  आणि साहित्य संमेलन या दोन्हीच्या अध्यक्षपदी महिला असणे हा योग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना बाबत  प्रथमच जुळून आला आहे.


साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ताराबाईंनी तातडीने ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणाल्या,' साहित्य हे केवळ अभिजनांपुरते सीमित आहे की काय असे वाटत असतानाच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या वाटेने जाणाऱ्या माझ्यासारख्या महिलेची निवड केली गेली. लोकसंस्कृतीवरचा अडाणीपणाचा शिक्का या माध्यमातून पुसला गेला याचा आनंद वाटतो. आदिमावस्थेपासून आधुनिक काळापर्यंतच्या मानवी जीवनाचा प्रवास लोकंपरंपरेतच प्रतिबिंबित झाला आहे.मराठी साहित्य संमेलनाने माझ्या निवडीतून जात्यावर दळण दळणाऱ्या भगिनी ते विविध लोक कलावंतांचा सन्मान केला आहे.'पुढे त्या म्हणाल्या , लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकनाट्याच्या अभ्यास- संशोधनाच्या प्रांतात रस घेऊन मी काम केले.माझ्या आधीही अनेक महानुभावांनी या परंपरेत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याबरोबरच हजारो वर्षापासूनच्या जात्यावरच्या ओव्यांमधून, चालीरीती परंपरेतून हा प्रवास अखंडपणे सुरू आहे. या सर्व प्रवाहाचा मी छोटासा भाग आहे .या प्रवाहाचा धांडोळा घ्यायची संधी मला मिळाली.माझ्या पूर्वी आणि माझ्यासोबतही अनेक जण या पुरस्कारासाठी पात्र होते व आहेत. त्या सर्वांच्या सदिच्छांसोबत हा बहुमान मी नम्रपणे स्वीकारते.'


लोकसंस्कृती  बाबत त्या म्हणतात'लोकसंस्कृती टिकवली पाहिजे असे म्हटले जाते तेव्हा ते अत्यंत चुकीचे विधान असते.मुळात काही टिकवायचे म्हणून टिकत नसते. लोकसंस्कृती तर गंगेच्या प्रवाहासारखी असते.ती समूहमनाचा आविष्कार असते.त्यातून ती टिकते.संस्कृतीच्या प्रवाहातील काही गोष्टी टिकतात,काही जुन्या नव्याने तयार होतात.बऱ्याचदा काही सत्ताधारी त्यात बदलाचे हेतूपूर्वक प्रयत्न करतात. मात्र जे समूहमन स्वीकारते ते टिकते. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे असते.'मराठी भाषेबाबत त्या म्हणाल्या,' मराठी भाषेचा गर्व नव्हे तर अस्मिता आपण जपली पाहिजे. जोपर्यंत कोणतीही भाषा सामान्य माणसांच्या चलनात असते तोवरच ती टिकते.त्याच वेळी ती आपल्या सर्व व्यवहारात आणण्याने ती समृद्ध होते. जेव्हा सामान्य माणूस भाषेला चलन व्यवहारातून डावलतो तेव्हा ती भाषा संपते. तेच चालीरीतींचे आहे.मराठी भाषक म्हणून जर आपल्याला मराठी टिकावी वाटत असेल तर आपली जबाबदारी अधिक आहे.आपण मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या चालीने जरूर जावे मात्र मराठीत बोलले पाहिजे. आपली मुळे विसरता कामा नये. ही मुळे मराठीत रुजली आहेत तिथून आपले पोषण होते आहे.


शिक्षणापेक्षा माणूस समजून घेणे महत्त्वाचे आहे असे मानणाऱ्या ताराबाई लोकसाहित्याबाबत म्हणतात, 'अडाणी लोकांचे साहित्य हा शिक्का केवळ मराठीतच नव्हे तर जगभरातील लोकसाहित्याबाबत मारला गेला. तिथल्या संशोधक ,अभ्यासकांनी तो पुसला.मी देखील लोकसाहित्याच्या सैद्धांतिक अभ्यासाचा प्रयत्न केला.हा अभ्यास मराठी पुरता न करता कन्नड ,तमिळ यासारख्या प्रादेशिक भाषांच्या अभ्यासातून केला. गेली  ५७ वर्षे मी सांगलीत राहते. हा प्रदेश कर्नाटक, गोवा सीमेवरचा असल्याने मला या प्रदेशात जाऊन लोक साहित्यात डोकावता आले. आद्य नाटककार विष्णुदास भावेनीही कन्नड नाटकाच्या प्रभावातून मराठी नाटक केले.त्यांच्या नाटकांचा मी पहिल्यांदा अभ्यास केला. ते नाटक लोकरंगभूमी उत्क्रांत होत गेले.गोवा, कर्नाटक, तामिळनाडू असा मोठा पैस मला इथे उपलब्ध झाला.' त्या म्हणाल्या,' इतक्या छोट्या आयुष्यात बाकीचे सर्व उद्योग करताना मनातल्या सर्व गोष्टी साध्य करण्यास मर्यादा येता. रेव्हरंड टिळक यांनी म्हटल्याप्रमाणे ' पुष्कळ अजुनी उणा प्रभू मी पुष्कळ अजूनही उणा 'अशी स्थिती आहे.तरीही माझे संस्कार मला समाधानी राहण्यास शिकवतात.'


१ एप्रिल १९३९ या दिवशी जन्मलेल्या ताराबाई आज वयाच्या ८५ व्या वर्षीही लिखाणापासून समाजमाध्यमांपर्यन्त सर्वत्र कमालीच्या सक्रिय असतात.डॉ.तारा भवाळकर यांची मराठीतील ख्यातनाम लेखिका, लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रा पर्यंतचा संशोधक, संदर्भ कोष, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक , भारतीय संस्कृती पासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक ,साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक , मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका,एक कसदार वक्त्या अशी विविधांगी ओळख महाराष्टाला आहे. डॉ. भवाळकर यांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्यप्रकारांची जडणघडण शोधली.त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ आणि चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तू पाठ आहे.त्यांनी आपल्या लोकसाहित्यात आणि लोक परंपरेत निसर्गाची पूजा केलेली दिसते.ताराबाई संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे असे व्यक्तिमत्व आहे.लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणाऱ्या व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक म्हणून त्यांना ओळखले जाते. परंपरागत अशी जी स्त्रीची प्रतिमा समाजात रूढ झाली होती त्यामागील पुरुषी दृष्टीकोन त्यांनी अभ्यासाअंती विशद केला असे ताराबाईंच्या बाबत म्हटले गेले आहे त्याचे महत्त्व मोठे आहे.


ज्यांच्याशी बोलून, संवाद साधून, ज्यांना ऐकून आपल्याला वैचारिक व सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत झाल असं वाटावं असं ज्ञानवंत,प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.तारा भवाळकर.मी ते गेली चाळीस वर्षे अनुभवतही आहे. त्यांच्या लोभस व समोरच्याला आपलंस करणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे त्या सर्वार्थाने ज्येष्ठ – श्रेष्ठ असूनही त्यांच्याशी ‘भवाळकर मॅडम ‘ पेक्षा ‘ ताराबाई ‘ म्हणून बोलणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या ताराबाईंशी बोलतांना बोलणाऱ्याला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटत असतोच. पण त्याचे दडपण त्याच्यावर येऊ न देण्याची अनोखी शक्ती ताराबाईंकडे आहे.म्हणूनच नवोदित कवी,नाटककार,कलावंत,दिग्दर्शक,कार्यकर्ते,रसिक असे सर्वजण त्यांच्याशी सहज संवाद साधू शकतात.त्यांच्याकडे बघून बरच काही शिकू शकतात.


तसेच नामवंत मंडळीही त्यांच्याकडे नेहमी येत असतात. कुसुमाग्रज, पुलं यांच्यापासून अनेक जुने नवे मान्यवर त्यांच्याकडे येऊन गेले व आजही येतात .सांगलीची नाट्यपंढरी ही जुनी ओळख आहेच.तसेच सांगलीत ताराबाई राहतात हीही एक महत्वाची ओळख आहे. साहित्य,नाट्य,चित्रपट,सामाजिक,सांस्कृतिक, वैचारिक अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आली तर त्या व्यक्तीला ताराबाईंना घरी जाऊन भेटल्याशिवाय कृतार्थ वाटत नाही हे वास्तव आहे. ‘तारा भवाळकर ‘ या नावाबरोबर जोडूनच एक कर्तृत्वसंपन्नतेचा आदर, संशोधकाची तपस्या , मायेची पाखर , आपुलकीची जाणीव येत असते. ताराबाईंचा स्नेहपरीवार राज्य,देश,विदेश असा सर्वत्र पसरलेला आहे. त्यांना प्रत्यक्ष न भेटता त्यांची केवळ पुस्तके वाचून त्यांच्यावर आदरयुक्त प्रेम करणाऱ्या वाचकांची संख्याही मोठी आहे.


ताराबाईंनी १९५८ ते १९७० या काळात माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केले. १९७० ते १९९९या काळात सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून काम केले. पदवी-पदव्युत्तर व विद्यावाचस्पती विद्यार्थी -विद्यार्थिनींना सतत मार्गदर्शन केले.‘ मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण : प्रारंभ ते १९२० ‘ या त्यांच्या पीएचडी प्रबंधाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कार म्हणून गौरवीले गेले होते.लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या अभ्यास व संशोधनासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर अनेकदा प्रवास केला.अनेक विद्यापीठांच्या विविध समित्यांवर तज्ञ म्हणून काम केले.अमेरिका व इंग्लंड येथील विद्यापीठातही त्यांनी साहित्य विषयक चर्चासत्रात मांडणी केली आहे. मराठी विश्वकोष ,मराठी वाङ्मयकोष, मराठी ग्रंथकोष,मराठी समाजविज्ञान कोष, मराठी चरित्र कोष अशा विविध संदर्भ ग्रंथासाठी त्यांनी लेखन केले आहे. मराठी विश्वकोशाच्या लोकसाहित्य विभागाच्या त्या अतिथी संपादकही होत्या. 


आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेल्या ताराबाईंनी कामगार साहित्य संमेलनासह विभागीय साहित्य संमेलनापर्यंत अनेक लहान मोठ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद  भूषविले आहे.शेकडो चर्चासत्रे व हजारो व्याख्याने दिली आहेत. राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषदात सहभाग घेतला. लोकसंस्कृतीच माहेरघर असलेल्या ताराबाई हे व्यासंगाच दुसरं नाव आहे असं म्हंटल तरी वावग ठरणार नाही. कारण त्या ज्या सहजपणाने खान्देशातील लोकगीतांवर बोलतात त्याच सहजपणे मार्क्सच्या गतिशील भौतिकवादावर बोलतात.कोणत्याही विषयाची अद्यावत किमान माहिती त्यांच्याकडे असते.ताराबाईंचा व माझा स्नेह गेल्या चाळीस वर्षाचा आहे.हे नाते कौटुंबिक जिव्हाळ्याचे आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.त्यांच्या घरी अनेकदा होणाऱ्या गप्पा असोत ,भेटी असोत.कधीही गेलो तरी बोलतांना बेसनाच्या लाडूपासून चिवड्यापर्यंत काहीतरी खायला नक्की मिळणार आणि मग त्यांना आवडणारी कॉफी होणार याची खात्री असतेच.त्या खाण्याच्या डिशमधून आणि कॉफीच्या मगातुन ताराबाईंची सारी ममता भरून वहात असते.


त्यांच्याबरोबर मी असंख्य कार्यक्रमात सहभागी झालो आहे. त्यांचा जीवनप्रवास उलगडणारी एक तब्बल आठ तासांची मुलाखत आकाशवाणी सांगलीमध्ये मी काही वर्षांपूर्वी घेतली होती.तसेच मनोविकास प्रकाशनच्या वतीने २०१८ साली प्रकाशित झालेल्या व मुकुंद कुळे यांनी संपादित केलेल्या ‘ प्रातिभसंवाद ‘ या पुस्तकात डॉ.तारा भवाळकर यांनी डॉ.रा.चिं.ढेरे , प्रा . कमल देसाई,उमा व विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या घेतलेल्या मुलाखती आहेत.तसेच त्याच पुस्तकात डॉ.तारा भवाळकर यांची मी घेतलेली तब्बल दीडशे छापील पानांची मुलाखतही आहे. ताराबाईंची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर

जिज्ञासूंनी ती जीवनप्रवास उलगडणारी मुलाखत जरूर वाचावी असे आवर्जून सुचवावेसे वाटते.


ताराबाईनी ललित, लोकसाहित्य, संशोधन, वैचारिक, कथा, एकांकिका चरित्र ,व्यक्तिचित्रे अशी बहुत स्वरूपाचे लेखन केले. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला ‘ या दीर्घ कवितेचा अनुवाद त्यांनी केला. राणीसाहेब रुसल्या, मधुशाला,यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा , प्रियतमा,लोकनागर रंगभूमी ,मिथक आणि नाटक ,लोकसंचित, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर ,

माझिये जातीच्या, मराठी नाट्य परंपरा शोध आणि आस्वाद, आचार्य जावडेकरांची पत्रे आणि संस्मरणे, लोकसाहित्य वाङ्मय प्रवाह,

मराठी नाटक :नव्या दिशा नवी वळणे, माय वाटेचा मागवा,तिसऱ्या बिंदूच्या शोधात,लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा , मायवाटेची रंगरूपे, आकलन आणि आस्वाद ,लोकसंस्कृतीची शोधयात्रा,लोकांगण, लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा, मनातले जनात, निरगाठ सुरगाठ, मातीची रूपे,मरणात खरोखर जग जगते, नाट्याचार्य खाडिलकर चरित्र, स्नेहरंग,लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, प्रातिभसंवाद, सीतायन, कथा जुनी तरी नवी, मुक्ती मार्गाच्या प्रवासीनी, आद्य नाटककार विष्णुदास भावे अशी त्यांची अनेक पुस्तके मराठी साहित्य प्रांतात अतिशय महत्त्वाची आहेत.गेल्या पाच सहा वर्षांमध्ये आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी संजय पाटील यांनी ताराबाईंना आग्रह करून त्यांच्याच काही कथा त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतल्या. ताराबाईच्या आवाजात या कथा ऐकणं हा एक विलक्षण अनुभव असतो. या कथा यूट्युबवरही आहेत. ‘तारा भवाळकर – जुन्या तरी नव्या कथा’ या नावाने सर्च केलं की त्या कथा ऐकता येतात.


ताराबाईना यांच्या लेखन व संशोधनाबद्दल महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि. म.गोखले पुरस्कार ,मसाप जीवन गौरव पुरस्कार ,पुणे नगर वाचनालयाचा श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा डॉ.अ.ना.प्रियोळकर पुरस्कार ,सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा रत्न शारदा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा विशेष सन्मान पुरस्कार, कन्नड महाराष्ट्र अनुबंध पुरस्कार ,डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवन गौरव पुरस्कारअसे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.तसेच त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचेही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.ताराबाई संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे असे व्यक्तिमत्व आहे.लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणाऱ्या व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक म्हणून त्यांना ओळखले जाते. परंपरागत अशी जी स्त्रीची प्रतिमा समाजात रूढ झाली होती त्यामागील पुरुषी दृष्टीकोन त्यांनी अभ्यासाअंती विशद केला.'


अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी फेसबुक वर केलेल्या पोस्टमध्ये आणि नंतर समाजवादी प्रबोधिनीच्या 'प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाच्या संपादकीया मधून मी चार वर्षापूर्वी डॉ.तारा भवाळकर यांना आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा उचित गौरव झाला पाहिजे अशी भूमिका मांडली तसेच खरेतर ताराबाईंसारख्या ज्येष्ठ विचारवंत ,संशोधक लेखिकेला हा सन्मान यापूर्वीच मिळायला हवा होता. अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याचा त्यांचा पिंड नव्हता व नाही. आता सर्वसहमतीने अध्यक्ष निवडीची पद्धत सुरु झाली आहे.त्यामुळे साहित्य महामंडळ व संबंधित संस्थानी यावर्षी ताराबाईंची एकमताने निवड करून राहून गेलेली उणीव भरून काढावी असे वाटते असे म्हंटले होते. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी साहित्यात संशोधन व लेखन स्वरूपाची चाळीसावर पुस्तकांच्या रूपाने सातत्यपूर्ण सकस भर घालणाऱ्या डॉ.तारा भवाळकर या वर्तमान महाराष्ट्रातील अग्रक्रमावरील विदुषी आहेत यात शंका नाही.आयुष्याच्या उमेदीच्या काळात साहित्यिकांना मान मिळायला हवा. आयुष्याच्या सायंकाळीही चालेल.पण अगदीच तिन्हीसांजेला नको. ही त्यांची प्रतिक्रिया कमालीची बोलकी आहे. आता त्यांना अध्यक्षपद मिळाले याचा आनंद शब्दातीत आहे.


गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ त्या सातत्याने कार्यरत आहेत. गेल्या चार वर्षांत जवळच्या व्यक्तीच्या निधना पासून ते प्रकृतीच्या लहान-मोठ्या तक्रारीपर्यंत अनेक आघातांना ताराबाईना सामोरे जावे लागले. उषाताई पत्की ही त्यांच्याप्रमाणेच नाशिककर असलेली मैत्रीण शिक्षिकेच्या नोकरीच्या निमित्ताने ताराबाईंच्या पाठोपाठ सांगण्यात आल्या. १९६७ पासून ताराबाई व उषाताई एकत्र राहत होत्या. कोरोनाच्या काळात २८ जून २०२१ रोजी उषाताई कालवश झाल्या. उषाताईंनी त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला सांगलीला बोलवून घेऊन ऑक्टोबर २०१५मध्ये  समाजवादी प्रबोधिनीला एक लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यावेळी उषाताई नको म्हणत असतानाही उषाताईंचा प्रबोधिनीचे तत्कालीन अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत कालवश प्रा.डॉ. एन.डी. पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार समारंभही प्रबोधिनीत केला होता. कारण एका शिक्षिकेने प्रबोधनकार्यासाठी तब्बल एक लाख रुपया ची भरीव देणगी दिलेली ती सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटना होती.त्या देणगीतून दरवर्षी महिलांसाठी एक कार्यक्रम अशी त्यांची इच्छा होती. तसे कार्यक्रम गेली नऊ वर्षे सलग सुरू आहेत.उषाताई स्वतः या कार्यक्रमांना उपस्थित असायच्या. उषाताई गेल्यानंतर २०२१ पासून त्यांच्या स्मृतीदिनी हा कार्यक्रम समाजवादी प्रबोधिनी करत असते. अर्थातच या प्रत्येक कार्यक्रमाला ताराबाई उपस्थित असतातच.ताराबाई उषाताईना 'षा ' म्हणत असत..५५ वर्षे बरोबर असणाऱ्या उषाताईंच्या निधनाने ताराबाईंना मोठा धक्का बसला आहे.या साऱ्याचा त्या कमालीच्या सकारात्मकतेने मुकाबला करत असतात. साहित्य,लोकसाहित्य ,लोकसंस्कृती,नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड पोसला आहे. त्यामुळे एक प्रकारची कमालीची सकारात्मक ऊर्जा त्यांच्यात नेहमी दिसून येते असं मला वाटतं. त्यांचे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून होणारे  भाषणही समग्र मानवतेला एक सकारात्मक ऊर्जा देणार असेल यात शंका नाही.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post