प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
ऐन गणेशोत्सवात कर्जत तालुक्यात तिहेरी हत्यांकाड घडल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यात पोशिर ग्रामपंचायत हद्दीत एकाच कुटुंबातील आईवडील आणि मुलाची हत्या करण्यात आली आहे.यातील महिला गर्भवती होती. या तिघांची हत्या का केली, कुणी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच गूढ उकलू, असा विश्वास कर्जत पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पोशिर गावातील चिकनपाड्यात रविवारी (8 सप्टेंबर) सकाळी दशक्रिया सुरू होती. त्यावेळी सकाळी नऊच्या सुमारास नाल्यात एका मुलाचे प्रेत सापडले. त्यामुळे सर्वजण हादरून गेले. त्यानंतर आणखी दोन प्रेते मिळाली. त्यातूनच तिघांची हत्या झाल्याचे उघड झाले. यात मदन जैतू पाटील (35), त्याची पत्नी अनिशा पाटील (28) आणि मुलगा विवेक (9) यांचा समावेश आहे. पाटील कुटुंब मूळचे कळंब बोरगावचे असून 15 वर्षांपासून ते चिकणपाडा येथे राहात होते.
तिघांच्या अंगावर जखमांचे व्रण आढळले आहेत. यातील मदन पाटील हा शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जातो. शिवाय त्याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. तिलाही मारेकऱ्यांनी सोडले नाही. नेरळ पोलिसांनी तातडीने पंचनामा करून तिन्ही मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणी त्यांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सर्व माहिती घेतली आहे.