प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीता. हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com
आज गणेश चतुर्थी आहे.गणेशोत्सवाला एक प्राचीन परंपरा आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी १९६४ साली संपादित केलेल्या 'भारतीय संस्कृती कोश ' या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात गणपती ही देवता आणि गणेश चतुर्थी याबाबत दहा-बारा पानांमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. गणेश वैदिक देवता की अवैदिक , आर्य की आर्येतर याचीही चर्चा त्यात आहे. समुदायाचा प्रभू म्हणजे गणपती , ज्ञानी जनातला अत्यंत ज्ञानी ,कीर्तीवंतातील कीर्तीवंत अशी विशेषणे असलेल्या गणपती बद्दलची ही माहिती जिज्ञासुनी वाचली पाहिजे. असे आज गणेशचतुर्थी निमित्त प्रारंभी सुचवावेसे वाटते. बुद्धीच्या देवतेचा सण सदसद विवेक बुद्धीनेच साजरा झाला पाहिजे. आपण आपल्या सांस्कृतिक वारसा संस्कारीत होतंच जपला पाहिजे. शेतात धान्य उगवते ती प्रकृती. पण ते धान्य अधिक चांगल्या प्रकारे उगवावे म्हणून जे संस्कार केले जातात ती संस्कृती असते असे आचार्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे. शब्दकोशात संस्कृती या शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा आहे .जीवनाच्या अंतर्भाह्य उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरलेला आहे. माणसाला कर्तव्याचा मार्ग दाखवते तिला संस्कृती म्हणतात. संस्कृतीचे अंतररूप आणि बाह्यरूप समजून घेण्याची आज नितांत गरज आहे. आज सण समारंभाचे बाह्यरूप वेगळाच आकार घेत असल्याने प्रशासनाला व पोलीस यंत्रणेलाही सण समारंभ शांततेत पार पाडले जावेत यासाठी गावोगावी स्वतंत्रपणे बैठका आयोजित कराव्या लागतात.
लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव या सणांना जाणीवपूर्वक सार्वजनिक रूप दिले. त्यामागे त्यांची व्यापक व दूर दृष्टीची भूमिका होती. ब्रिटिशांविरोधी लोकांना एकच आणण्याचे ते प्रभावी साधन म्हणून लोकमान्यांनी त्याकडे पाहिले होते.त्यात बऱ्याच अंशी लोकमान्यांना यश आले होते. पण आज त्यातील एकतेचा तो हेतू कुठेतरी हरवला आहे, लोप पावत चालला आहे असे दिसते. आपल्यापैकी अनेकांना गणेशोत्सव असा असावा असा वाटतो तसा तो होत नाही आणि जसा नसावा असे वाटते तसा मात्र होताना दिसतोय. कौटुंबिक पातळीवरचे मांगल्य सार्वजनिक पातळीवर तेवढ्या गांभीर्याने पाळले जात नाही असे दिसते .अर्थात ही बाब केवळ गणेशोत्सवा पुरती मर्यादित नाही तर अनेक उत्सवांबाबतबाबत असे घडताना दिसते. अनेकात एकता व एकतेत विविधता हे आपले सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्राच्या गावोगावीच नव्हे तर गल्लोगल्ली आणि देशातील अनेक राज्यांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गेल्या काही वर्षात ज्या देशात भारतीयांची संख्या वाढली तेथेही हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे. लाखो लोकांचा त्यात सहभाग असतो. अब्जावधीची उलाढाल असते .तरुणांची मोठी ऊर्जा यात खपत असते. नवे कार्यकर्ते तयार होतात.अनेक चांगले उपक्रम जसे होतात तसेच नको त्या गोष्टीही घडत असतात .त्याचा फटका सर्वसामान्य माणसांना बसत असतो .त्यामुळे ह्या उत्सव कशा असावा कसा नसावा याचा विचार करण्याची गरज निश्चितच निर्माण झाली आहे. विवेका पेक्षा भावनात्मक भडकता वाढत जाणे हे बुद्धी देवतेलाही मान्य नसते.
गणपती हा विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो तसेच ती बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. कोणत्याही कार्याची सुरुवात त्याच्या पूजनाने करण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र या विघ्नहर्ताच्या उत्सवातच काही विघ्नकर्ती मंडळीं नतदृष्टपणा करतात. अश्लीलता,चंगळवाद, व्यसनाधीनता, गुंडगिरी या नको त्या बाबींचे दर्शन आज अशा सार्वजनिक उत्सवात होते. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होतात .पोलीस यंत्रणेवर तर ताण पडतोच पडतो पण सर्वसामान्य नागरिकांनाही ताणाला सामोरे जावे लागते. या मंगलदेवतेचा सण मंगलमय वातावरणात साजरा करण्यापेक्षा डॉल्बी सारख्या कर्कश्य शब्दश: हादरून सोडणाऱ्या आवाजात साजरा करण्यात औचित्यभंग होतो आहे हेही ध्यानात घेतले पाहिजे.तसेच ध्वनी ,वायू ,रासायनिक रंग यासारख्या सर्व प्रकारचे प्रदूषण टाळले गेले पाहिजे. प्लास्टिक व थर्माकोल यांचा अतिवापर टाळला पाहिजे.अलीकडे तर गणेशाच्या भल्या मोठ्या मूर्तीची स्पर्धा होत आहे. भक्तीची उंची मूर्तीच्या फुटांवरून करत नसते हे आम्ही विसरलो आहोत की काय असा प्रश्न समाजातील अनेक श्रद्धाळू लोकांनाही पडतो आहे. राज्यघटनेने दिलेले श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य उपभोगताना घटनेने सांगितलेल्या कर्तव्याचे भान मात्र सुटत चालले आहे. सार्वजनिक उत्सवांसाठी हे सारे फारच घातक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी व प्रशासनाने तयार केलेल्या जलकुंडामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करणे ही फार महत्त्वाचे आहे.
खरंतर गणेशोत्सव हा संस्कृती संवर्धित करणारा व विकृतीचा नाश असणारा असला पाहिजे.सामाजिक ऐक्य, प्रेम , जिव्हाळा,विश्वासार्हता वाढवून समाज उन्नत करणारा असला पाहिजे .आजच्या समकालीन प्रश्नांचे प्रबोधन त्यातून झाले पाहिजे. देशी कला-क्रीडा यांना उत्तेजन दिले गेले पाहिजे. विषमता नष्ट होऊन सर्वांगीण समता प्रस्थापनेसाठी या उत्सवाचा वापर झाले पाहिजे. एक गाव एक गणपती ही आदर्श संकल्पना अनेक ठिकाणी राबवली जाते . त्या धर्तीवर मोठ्या शहराने किमान एक प्रभाग एक गणपतीची सुरुवात केली पाहिजे .तरुण शक्ती विधायक कार्यात गुंतवण्याचा प्रयत्न समाजधुरिणांनी ,लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. आजही अनेक मंडळी अतिशय आदर्श पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात.त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घेतली पाहिजे. प्रतिष्ठापने पासून विसर्जनापर्यंत जबाबदारीने व कर्तव्य भावनेने हा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.
एवढ्या प्रचंड ऊर्जेने दरवर्षी साजरा होणाऱ्या या उत्सवातून आपले गाव, शहर, गल्ली यावर्षी किती पुढे गेले याचा विचार केला पाहिजे. आज गणपतीचे आगमन होते आहे.आणखी दीड, पाच, सात, दहा दिवसांनी गणपती बाप्पा मोरया पुढील वर्षी लवकर या असे आवाहन गणरायाला करताना पुढच्या वर्षीच्या स्वागताला अधिक सुबुद्धपणांनी या मंडळींनी यावे असेच त्या बुद्धीदेवतेला वाटत असणार यात शंका नाही. कारण शेवटी हा एक अतिशय चांगला संस्कृतिक सोहळा आहे. 'भारतीय संस्कृती ही संग्राहक आहे .ती सांतातून अनंताकडे ,अंधारातून प्रकाशाकडे, भेदातून अभेदाकडे , विरोधातून विकासाकडे, विकारातून विवेकाकडे ,गोंधळातून व्यवस्थेकडे, आरडाओरडीतून संगीताकडे जाणारी आहे असे साने गुरुजींनी म्हटले आहे. म्हणूनच या सणाला अनंत ,प्रकाश, अभेद ,विकास ,विवेक, व्यवस्था, संगीत याकडे नेने ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)