प्रेस मीडिया लाईव्ह :
इगतपुरी येथे रेल्वेमध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीला गोमांस बाळगल्याच्या संशयावरून झालेली मारहाण मनाला वेदना देणारी आहे. कोण काय खावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. गोवंश हत्या प्रतिबंध कायद्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने 2016 साली दिलेला निवडा याप्रसंगी फार महत्त्वपूर्ण आहे. आपले हक्क काय आहेत हे मुस्लिम समाजाला समजणे आवश्यक आहे.
गोवंश हत्याबंदी कायदा वैध ठरवत गोवंशाचे मांस खाण्यावरील बंदी मात्र हटवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. एवढेच नव्हे, परराज्यातून आणलेले गोवंश मांस बाळगणे किंवा अजाणतेपणी गोवंशाचे मांस बाळगणे हा गुन्हा ठरणार नाही. या निकालामुळे राज्यात आता केवळ गोवंश हत्येला मनाई राहणार असून बैलाचे मांस खाण्याला मनाई नाही.
राज्य सरकारने तयार केलेल्या कायद्याच्या ५ ड आणि ९ ब कलमानुसार परराज्यातील गोमांस आणणे, वापरणे आणि बाळगणे हा पण गुन्हा होता. त्यावर मूलभूत हक्कांचा दाखला देत ही तरतूद न्यायालयाने घटनाबाह्य ठरवली. गोमांस बाळगण्याला गुन्ह्याच्या कक्षेतून वगळू नये यासाठी राज्य सरकारने विशेष विनंती अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सुरेश गुप्ते यांनी सरकारची ही मागणी फेटाळून लावली.
कोर्टाने पुढे नमूद केले, की प्रत्येक नागरिकाला त्याने काय खायचे किंवा नाही खायचे याचा अधिकार आहे. सबब परराज्यांतून आयात केलेले गोमांस भक्षण करणे हा गुन्हा ठरवणारे कलम मूलभूत हक्कांशी विसंगत आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा घटनादत्त अधिकार आहे व सरकारने कोणाच्याही घरात घुसून गोमांस आहे की नाही हे तपासणे या हक्काच्या विरुद्ध आहे.
कोर्टाने या कायद्याचे ‘कलम नऊ ब’देखील रद्दबातल ठरवले. या कलमाप्रमाणे, आरोपीलाच त्याचे निर्दोषत्व सिद्ध करताना त्याच्याजवळ असलेले मांस हे गोवंशाचे नाही किंवा खरेच त्याला माहीत नव्हते की हे मांस गोवंशातील आहे, याचे पुरावे द्यावे लागत. कुठल्याही सामान्य माणसाला नुसते मांस बघून ते गाईचे आहे, का बैलाचे आहे, की रेड्याचे आहे, हे सांगता येणार नाही. म्हणून आरोप करणाऱ्याला आता सिध्द करावे लागेल के गोमांस आहे किंवा नाही. बर्डण ऑफ प्रूफ हे आरोप करणाऱ्यावर असेल आरोपीवर नाही.
संदर्भ :
https://www.thehindu.com/news/cities/mumbai/news/possession-or-consumption-of-beef-not-a-crime-hc/article8568392.ece
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/mumbai/hc-strikes-down-criminalizing-possession-of-beef-brought-from-outside-maharashtra-1235950/lite/
https://www.google.com/amp/s/marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/can-eat-or-keep-beef-brought-from-outside-maharashtra-says-bombay-high-court/amp_articleshow/52157081.cms
https://www.google.com/amp/s/divyamarathi.bhaskar.com/amp/news/mah-mum-beef-possession-if-brought-from-outside-maharashtra-not-a-criminal-offence-mumba-5317397-nor.html