अक्षयचा एन्काऊंटर की शासकीय मर्डर...

हा कसला एनकाऊंटर, हा तर चक्क कोल्ड ब्लडेड  मर्डर !



प्रेस मीडिया लाईव्ह :

जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याच्या हेतूने अक्षय शिंदे या नराधमाचे प्रकरण शासन व पोलीस प्रशासन करीत आहे.या प्रकरणी पत्रकारांना माहिती देतानाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे चेहरे हे खोटं लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत होते या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावताना "जे लोक या नराधमाला फाशी देण्यैची मागणी करीत  होते तेच आत्ता आरोपीची बाजू घेत असल्याचा पलटवार केला. त्या नराधमाला फाशीच झालीच पाहिजे अशी महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी होती यात शंकाच नाही परंतु ती न्याय व्यवस्थेने द्यावी ही जनतेची आणि विरोधकांची मागणी होती.. मुख्यमंत्र्यांनी विरोधक व जनतेच्यावतीने करण्यात आलेल्या फाशीच्या मागणीची अंमलबजावणी केली असती तर ते अभिनंदनास पात्र ठरले असते. परंतु एनकाऊंटर चे नाटक करून मुख्य आरोपीचा काटा काढून मुळ संघाचे असलेल्या संस्था चालक व मुख्याध्यापकांना आरोपातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री कम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सुपिक खोबडीतून या एनकाऊंटर रूपी सुरस कथानक जन्मास घालून पोलीसांनी त्याची अंमलबजावणी केली असावी,असा संशय घेण्यास पुरेसा वाव आहे.

याबाबत घटनाक्रम पाहूया-

१२ व १३ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले.

पोलीसांनी गुन्हा नोंदवायला २  दिवसाचा विलंब केला.

१६ ऑगस्ट रोजी बदलापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

१७ ऑगस्ट रोजी नराधम अक्षय शिंदेला अटक

२० ऑगस्ट रोजी आदर्श विद्यालय या शाळेची तोडफोड व संतप्त जनतेचे रेल रोकोचे उग्र आंदोलन  व आंदोलकांवर गुन्हे दाखल.

१९ सप्टेंबर रोजी आरोपी विरोधात कल्याण सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल. आणि चारच दिवसात आरोपीचा कथित एन्काऊंटर

यात कळीचा मुद्दा असा आहे की १२- १३ ऑगस्टला ही घटना घडली तरी आजतागायत संस्थाचालक आपटे हा फरार आहे.स्काॅर्टंडलॅन्ड पोलीसांशी तुलना होणारे पोलीस,ज्यांना अजिबात गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशा संस्थाचालकांना गेल्या ४० दिवसात अटक करून शकले नाहीत नव्हे तर राजकिय वरदहस्त ठेवून आत्ता त्यांना शरण येण्याचा मार्ग मोकळा केला गेला आहे, अक्षय शिंदेचा क्षय (संपवून) मोकाट आरोपींना अभय देण्याचे पुण्य मात्र महाराष्ट्राच्या लाडकी बहिणफेम सरकारने पदरात पाडून घेतले आहे. आत्ता ना रहा बास, ना बजेगी बासरी ! अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे.

एन्काउंटरचा बनाव कसा संशयाच्या भोव-यात अडकला आहे यावर मुंबई हायकोर्टाने नाराजी व्यक्त करताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

एका कुप्रसिद्ध व ज्याच्या विरोधात  प्रचंड जनआक्रोश आहे अशा लैंगिक अत्याचा-यास न्यायालयात न नेता पोलीस ठाण्यात का आणले ? पोलीसांनी न्यायालयाची परवानगी घेतली होती का ?

आरोपीला कारगृहाबाहेर नेताना बेड्या घालाव्या लागतात व काळा बुरखा घालावा लागतो, तसे केले होते का ? केले नसल्यास का केले नाही.

ठरलेल्या स्क्रिप्टनुसान त्या आरोपीस मुंब्रा बायपासवरून आणले तेव्हा दोन्ही हातात बेड्या ठोकलेला आरोपी ज्याला बुरखाही घातलेला असावा त्याने पाच सहा पोलीसांच्या गराड्यात असताना सहाय्यक पोलीस निरिक्षकाची सर्विस रिव्हाल्वर हिसकावून घेणे शक्य आहे का ? पोलीस कोणत्या गुंगीत होते ?

सर्विस रिव्हाल्वर नेहमी पाऊचमधे लॉक केलेले असते त्याचे लॉक खोलण्याचे प्रशिक्षण आरोपीस  दिले होते का ? सर्वसामान्य व्यक्ति ते लॉक सहजासहजी खोलू शकत नाही. बरं कमरेचे रिव्हॉल्वर हिसकावताना त्या पोलीस अधिका-यास झटका तर बसलाच असेल, मग त्याने लॉक उघडे पर्यंत व तीन फैरी झाडे पर्यंत कोणाची वाट पाहिली ? इतर पोलीस अधिकारी काय करीत होते? त्यांनी सदर आरोपीवर झडप घालून ते रिव्हॉल्वर कसे ताब्यात घेतले नाही ?

म्हणे आरोपीने तीन फैरी झाडल्या त्यातल्या दोन मीस फायर झाल्या मग पोलीस बंदिस्त वॅनमधे तिस-या फायरची वाट पाहत बसले होते व तिसरी गोळी नेमकी पायावर का मारली गेली ?

या नंतर पोलीस निरीक्षक संजय शिंदे  याने आरोपीच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या ?? त्यामात्र पायावर न झाडता त्याच्या वर्मी लागून जागीच मृत्यू झाला तरी तो कळवा रूग्णालयात मरण पावल्याचे जाहिर करण्यात आले !

काही अतिउत्साही राजकिय कार्यकर्त्यांनी संजय शिंदे ने परमवीर चक्र मिळवल्याच्या अविर्भावात त्यांच्या पत्नीचा सत्कार केला. काहींनी फटाके वाजवून क्रूरकर्म्याचा खातमा झाल्याबद्धल फटाके वाजवले. 

 मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर दुगुण्या झाडण्याची संधी या वेळीही सोडली नाही. जे विरोधक  आरोपीला फाशी द्या म्हणत होते तेच आत्ता आरोपीची बाजू घेत आहेत. लाडकी बहिण योजनेने विरोधक धास्तावले आहेत, इत्यादी मुक्ताफळे उधळली.

आरोपीचा खात्मा केला ! असे जाहिर करून त्याचे श्रेय घेण्याची धमक त्यांच्यात  नाही. संस्थाचालक आपटे व अन्य आरोपींना ४० दिवसात अटक करू न शकणारे गृहखाते मात्र पोलीसांनी स्वसंरक्षणार्थ एनकाऊंटर केल्याची थाप मारत आहे. मुळात संघाशी संबंधित शाळा व संस्थाचालकांचा बचाव व्हावा म्हणून पोलीसांनी हा कोल्ड ब्लडेड मर्डर करून त्याला एनकाऊंटरचा मुलामा देऊ पाहत आहे. 

तुम्ही,  लोक मुर्ख असल्याचे गृहित धरून मुर्खासारखे स्टेटमेंट करीत आहात. सुरूवाती पासून संस्थाचालकांचा बचाव करण्याची नीति पोलीसांनी गृहखात्याच्या इशा-यावरून आखली असावी व ही एन्काऊंटर स्क्रिप्ट अंमलात आणली असावी अशी शंका आहे.


ज्येष्ठ पत्रकार श्री उमेश जामसंडेकर 

अध्यक्ष - जनहित फाउंडेशन महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र youtube channel
8605205855

Post a Comment

Previous Post Next Post