सत्य, अहिंसेचे क्रांतिकार्य आणि ऐक्याची विचारधारा हे सरहद गांधींचे वैशिष्ट्य होते - प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१ भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अतिशय  मोलाची भूमिका बजावणारे, महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी, सरहद प्रांतामध्ये महात्मा गांधींच्या प्रमाणे काम करणारे सरहद गांधी उर्फ खान अब्दुल गफार खान हे अतिशय मोठे व्यक्तिमत्व होते.सत्य, अहिंसा ,राष्ट्रप्रेम शुद्ध जीवन, निर्भयता आणि ईश्वरसेवा यांच्या संवर्धनासाठी त्यांनी खुदाई खिदमदगार ( ईश्वराचा सेवक) ही संघटना स्थापन केली. 

एक लाखहून अधिक सभासद असलेल्या लाल डगलेवाल्यांच्या या संघटनेने काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीस पुरक ठरणारे मोठे काम केले. वायव्य सरहद प्रांतातील अफगाण लोकांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत करण्यासाठी त्यांनी  राष्ट्रीय शाळा काढली. रौलेट ॲक्ट सारख्या जुलमी कायद्याविरोधात मोठे आंदोलन उभे केले. स्वातंत्र्याची नवी दृष्टी लाभलेला व त्यासाठी संघर्ष करणारा समाज निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. स्वतंत्र भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही तत्त्वांचा अंगीकार करणारा असेल अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना प्रेरणास्थानी मानत गेल्या शतकभरात जगभर अनेक व्यक्ती ,संस्था ,चळवळी उभ्या राहिल्या. त्यामध्ये जनतेनेच सरहद गांधी असे संबोधलेल्या खान अब्दुल गफार खान यांचे कृतिशील क्रांतिकार्य आणि सर्वांगीण ऐक्याची विचारधारा यांचे महत्त्व मोठे आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने  ' सरहद गांधी : व्यक्ती आणि कार्य 'या विषयावर हे चर्चासत्र होते. या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, देवदत्त कुंभार, अन्वर पटेल, अशोक केसरकर, पांडुरंग पिसे, सचिन पाटोळे, शकील मुल्ला , रामभाऊ ठिकणे, अशोक मगदूम आदींनी सहभाग घेतला. त्यातून सरहद गांधी यांच्या व्यक्तित्व व कार्यकर्तुत्वावर विविध अंगाने प्रकाश टाकण्यात आला.


या चर्चासत्रामधून असे मत पुढे आले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झालेला असताना, भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू असताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठी भागीदारी करणाऱ्या सर्वांचे योगदान वारंवार अधोरेखित करण्याची गरज आहे. सरहद गांधी हे त्यापैकीच एक महत्त्वाची व्यक्तिमत्व होते. वायव्य सरहद प्रांतातून ते काँग्रेसकडून संविधान सभेत निवडून गेले होते. आपण केवळ सेवक आहोत या भूमिकेतून त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी दोन वेळा नाकारली होती. मात्र फाळणी पर्यंत ते काँग्रेसच्या कार्यकारणीचे सदस्य होते. त्यांनी भारताच्या फाळणीला कडवा विरोध केला होता. जर फाळणी अपरिहार्य असेल तर वायव्य सरहद प्रांतातील पठाणांसाठी  स्वायत्त  पखतुनिस्तान झाले पाहिजे अशी त्यांची मागणी होती. पण तसे झाले नाही, प्रांत पाकिस्तानातच राहिला. पाकिस्तानातही ते आपल्या भूमिकांमुळे जवळ जवळ दोन दशके वर्षे तुरुंगातच होते. १९८५ साली शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांचे नामांकन झालेले होते. १९८७  साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला होता. आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे जवाहरलाल नेहरू पारितोषिकही त्यांना लाभलेले होते. आयुष्यभर सत्य,अहिंसा धर्मनिरपेक्षता अशा मानवतावादी मूल्यांचा स्वीकार करून त्यांचा प्रसार व प्रचार करणारे सरहद गांधी हे एक थोर व्यक्तिमत्व होते.

Post a Comment

Previous Post Next Post