प्रेस मीडिया लाईव्ह :
दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी तमाशाचे फड कामाला लागतात. १९९२ साली कवलापूर (सांगली) येथील काळू-बाळू लोकनाट्य तमाशा फडाच्या तलमींचे उदघाटन करण्याचा सन्मान मला मिळाला होता. दसऱ्याच्या दिवशीच लोककलेचा अभ्यासक आणि लोकनाट्य कलावंत म्हणून औरंगाबादचे प्रा. डाॅ. रुस्तूम अचलखांब यांनी काळू, बाळू म्हणजेच लव आणि अंकुश खाडे यांना पत्र पाठऊन माझी ओळख करुन दिली होती. त्या दिवशी काॅलेजला सुट्टी होती मी सकाळीच चहा पिऊन बसने कवलापूरला खाडेंच्या शेतात गेलो. अंकुश खाडे दारासमोरील झाडाच्या सावलीत बाजेवर बसले होते. माझी पहिलीच भेट होती. मी त्यांना माझा परिचय करुन दिला. त्यांना खूप आनंद झाला. बाजेवर माझ्यासाठी घोंगडी टाकली. तोपर्यंत लव खाडेही झाडाखाली आले. मी आदबीने नमस्कार केला.
गप्पा करता करता चहा झाला. थोड्यावेळाने पोहे झाले. मी बॅचलर होतो, त्यामुळे घरी लवकर जाण्याची चिंता नव्हती. दुपारपर्यंत तमाशातील वेगवेगळ्या अडचणींवर गप्पा मारल्या. दुपारी नळी खाल्ली. रात्री नऊ वाजता तमाशा फडाचे उदघाटन होते. कवलापूरच्या दिवाळीच्या यात्रेत पहिला मानाचा प्रयोग करुन ते भटकंतीसाठी निघणार होते.
दोन ट्रक सर्व्हिसिंग करुन, रंग रंगोटी करुन तयार ठेवल्या होत्या. एक ट्रक तंबू, वाद्य, लाईट्स, पडदे यासाठी होता. दुसरा ट्रक कलाकार आणि त्यांच्या साहित्यासाठी सज्ज होता.
आम्ही चालत चालत तालमींच्या ठिकाणी गेलोत. बंद पडलेल्या आॅईल मिलमध्ये तालीम सुरु होती. ढोलकीची थाप कानावर पडली. अंगात शीरशिरी आली. हार्मोनियमच्या विशिष्ट ढंगाचे, हवेहवेसे वाटणारे सूर कानावर पडले. ओळखीच्या लावणीच्या सुमधूर आवाजाने काळीज हललं. एका पायात पाच किलोचे, असे दहा किलोचे चाळ बांधून भगिणी प्रॅक्टीस करीत होती.
आम्ही तिघे तेथे पोहचताच. सर्व कलाकारांनी विशिष्ट आपुलकीने आमचे स्वागत केले. अंकुशरावांनी माझी ओळख करुन दिली. मी लोकनाट्यातला खूप कुणीतरी मोठा आहे, असे कलाकारांना वाटत होते. पण मी कुणीच नव्हतो. त्यांच्यापैकीच एक तमाशावर संशोधन करणारा आणि कलापथकातून सोंगाड्या साकारणारा मामुली कलाकार होतो.
प्रा. डाॅ. अचलखांब सरांनी मला तमाशातून उचलून आणून नाटकात घातल्याने प्राध्यापक झालो होतो.
मी काही सूचना कराव्यात अशी विनंती करण्यात आली. मी भांबावलो. महाराष्ट्र गाजवणाऱ्या, नावारुपाला आलेल्या कलाकारांना मी काय शहानपण शिकविणार?
परंतू त्यांची अपेक्षा पाहून आणि माझ्या मर्यादा सांभाळून एका नर्तिकेला सूचना केली. 'लावणी घुंगरात नाही, तर तुमच्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे. डोळ्यातू व्यक्त झाली पाहिजे. लावणी करताना हास्य आणि चेहऱ्यावरचे सौंदर्य खुलून दिसले पाहिजे. काही भगिनी चेहऱ्यावर कोणताच भाव न दाखवता नृत्य करतात' माझं अभ्यासू ज्ञान मी पाजळलं होतं. पण त्यांनी ते मान्य केलं होतं.
सध्या तमाशा कलाकारांचे हाल होत आहेत. कोणी भाजीपाला विकत आहे, कोणी बाजारात फिरुन किटलीतून चहा विकत आहे. दोन वर्षात ट्रकला स्टार्टर लागला नाही, घुंगरु धुतले नाहीत की ढोलकीची शाई बदलली नाही.
महाराष्ट्रात स्वत:च्या तंबूतून, तिकीट लाऊन वर्षभर कार्यक्रम करणारे १८ फड आहेत. चार महिने कार्यक्रम करणारे ८० फड आहेत, तर यात्रा, जत्रा, ऊरुसात सुपारी घेऊन आपली कला सादर करणारे १२० संच आहेत. प्रत्येक फडात किमान ७० माणसे असतात, तर २०-२५ जनांचा संच असतो.
एवढे सगळे कलाकार, तंत्रज्ञ, वादक, गायक, कामगार आज टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडत आहेत. पण कला आणि कलाकार कधीच मरत नसतो. तमाशाला चांगले दिवस येतील. पुन्हा ती ढोलकीची थाप आणि अस्वस्थ घुंगरु बोलू लागतील.
तूर्त एवढेच!