भाजप, काँग्रेसला मागे टाकत वंचितची 'आघाडी' . तब्बल ११ जागांवर उमेदवार..

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने पुढचे पाऊल टाकले आहे.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

  महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतांनाच वंचित आघाडीने आपल्या ११ उमेदवारांची पहिली यादी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने शनिवारी दुपारी जाहीर केली. निवडणुकीच्या दृष्टीने वंचितच्या तयारीला वेग आला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. लवकरच निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून संघटनात्मक बांधणीसह मोर्चेबांधणी केली जात आहे. सर्वपक्षीय इच्छूक कामाला लागले असून जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. 

  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का घसरला. 

वंचित आघाडीचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही. 

  ॲड. प्रकाश आंबेडकर यांना स्वत: पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. या अपयशाला झटकून वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमधून वंचित आघाडीने इच्छुकांचे अर्ज मागवले होते.  त्यानंतर आता वंचित आघाडीने ११ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. महायुती व मविआमध्ये जागा वाटपावरून ओढाताण सुरू असून अंतर्गत वाद वाढले आहेत.  या सर्व पार्श्वभूमीवर वंचितने थेट उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे. 

उमेदवार कोण ?

वंचितने वाशीम विधानसभा मतदारसंघामधून मेघा डोंगरे, सिंदखेडराजामधून सविता मुंढे, रावेर शमिभा पाटील, धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षित-पश्चिम विनय भांगे, साकोली अविनाश नन्हे, नांदेड दक्षिण फारुक अहमद, लोहा शिवा नरंगले, छत्रपती संभाजीनगर पूर्व विकास दांडगे, शेवगाव किसन चव्हाण व खानापून विधानसभा मतदारसंघातून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

उमेदवारांच्या जातीचा उल्लेख

वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना त्यामध्ये संबंधितांच्या जातीचा देखील उल्लेख केला आहे. या अगोदर लोकसभा निवडणुकीत वंचितने उमेदवारांसोबत त्यांची जात सुद्धा जाहीर केली होती. तोच कित्ता विधानसभा निवडणुकीत वंचितने गिरवला. वंचितने सर्वसमावेशक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. 

  वंचितकडून लवकरच आणखी काही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post