प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने पुणे शहर व राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चेचे खुले आव्हान देण्यात आले आहे. सद्य परिस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकां मधील जागावाटप आणि मुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाला मिळणार याच चर्चेत अडकलेले असताना आम आदमी पार्टी मात्र खंबीरपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहर व राज्यातील पुढील प्रश्नांवर चर्चेसाठी पुढे यावे व येणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आम आदमी पार्टीच्या पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे पंतप्रधान यांना प्रश्न :
1) पुणेकरांचा नदी सुधार प्रकल्पाला विरोध असतानाही हा प्रकल्प राबवून नेणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद का दिले गेले? नदी सुधार प्रकल्पामुळे पुणेकरांना काय फायदा झाला याचे स्पष्टीकरण पुणेकरांना द्यावे.
2) दहा वर्षांपूर्वी घोषणा आणि उद्घाटन केलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे तसेच इंदूमिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अद्याप पूर्ण का झाले नाही?
3) पुण्याच्या रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांची दखल राष्ट्रपतींना घ्यावी लागते व खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश द्यावे लागतात, हे पुण्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींचे अपयश मोदी जी का खपवून घेत आहेत?
4) पुण्यात वारंवार घडणाऱ्या कोयता गँग, ड्रग्स च्या घटना राज्यातील भाजपचे सरकार का थांबवू शकले नाही?
5) पुणे शहरातील मुळा मुठा या नद्या स्वच्छ कधी केल्या जाणार? जायका प्रकल्प कुठे गेला?
6) पुणे महापालिकेने 2017 आणि 2021 मध्ये हद्दवाढ करून 34 गावे समाविष्ट करून घेतली आहेत. आज पर्यंत एकही सुविधा दिली नाही पण टॅक्स चालू आहे. तसेच DP प्लॅन सुद्धा मंजूर नाही. जोपर्यंत विकास आराखडा करून, अंमलबजावणीला सुरुवात होत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स का घ्यावा? फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेच्या हद्दीत असताना आणि त्यांच्याकडून महापालिकेने कर गोळा केलेला असताना देखील त्यांना कोणत्याही सुविधा आजवर देण्यात आलेल्या नव्हत्या तसेच आता या दोन्ही गावांच्या समावेश नवीन नगरपरिषदेत करून त्यांच्यावर अन्याय का केला गेला? त्यांच्याकडून आत्तापर्यंत महापालिकेने घेतलेला कर परत केला जाणार आहे का?
7) महाराष्ट्र अनेक वेळा पेपरफुटी झाली. अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी साठी महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन, मोर्चे काढावे लागतात. हे सर्व पाहता महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणारी रिक्त पदांची भरती का होत नाही? तसेच निवृत्त अधिकारी यांना सेवावढ का दिली जाते व तरुणांवर अन्याय का केला जातो?
8) पालिकेच्या शाळेत दारूचे सेवन, गुटखा, अमालिपदर्थ सेवन सर्रास होत आहे. मुलींना छेड छाडीचे अनेक प्रकरणे नियमित घडत आहेत. असे असताना भाजप चे पुणे शहरातील नेते गुंडांना घरी जाऊन भेटतात. असे नेते तुम्हाला चालते का?
भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फोडून राज्यात आपली सत्ता स्थापन केली आहे. परंतु सत्ता स्थापनेनंतर भाजपा व महायुती मधील इतर घटक पक्ष यांनी जनतेच्या प्रश्नाकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. जनतेमध्ये महायुती विरोधात प्रचंड असंतोष असून याचाच फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत देखील बसलेला आहे. भाजप प्रणित महायुती सरकार हे एक अपयशी सरकार असून जनतेच्या अपेक्षांवर फोल ठरले आहे त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची गरज आहे. असे असताना देखील केंद्र सरकार चुकीच्या गोष्टींवर त्यांची पाठ राखण करत असून याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नक्कीच भोगावे लागतील. आम आदमी पार्टी यापुढे विरोधकांची प्रमुख भूमिका बजावणार असून शहर तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात सरकारला धारेवर धरण्याचे पार्टीच्या वतीने ठरवले आहे. पंतप्रधानांनी आम आदमी पार्टी पुणे शहर च्या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास त्यांच्या दौऱ्याचा पुणे शहरात मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येणार असून कार्यकर्त्यांच्या वतीने पंतप्रधान शहरात असताना वेगवेगळी आंदोलने करण्यात येणार असल्याचे यावेळी पार्टीचे शहराध्यक्ष *श्री सुदर्शन जगदाळे* यांनी सांगितले