प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आज पासून स्वारगेटहून पिंपरीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोचा नवा मार्ग सुरू होत आहे. हा प्रवास अवघ्या ३० रुपयांत करता येणार आहे.शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिका रविवार दुपारी चार वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार आहे.पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो गर्दीच्या वेळी दर सात मिनिटांनी तर कमी गर्दी वेळी दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.
स्वारगेट पासून मंडई अवघ्या दहा रुपयांत आणि जिल्हा न्यायालया पासून मंडई स्थानकापर्यंतचा प्रवास पंधरा रुपयांत करता येणार आहे. स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मेट्रो सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड, रामवाडी आणि वनाज परिसरातून शहराच्या मध्यवर्ती भागात येणार्या प्रवाशांची विनाविलंब वेगवान सोय होणार असल्याने सणासुदीच्या काळात मध्यवर्ती शहरातील खासगी वाहनांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
महामेट्रोच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गिका पूर्णपणे सुरू होत आहेत. या मार्गिकांवरील काही स्टेशनची कामे अद्याप अपूर्ण असली तरी प्रवासी वाहतुकीत कुठलीही अडचण येणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
त्यानुसारच या दोन्ही मार्गिकांवरील काम जसजसे होत गेले तसतशी टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. यातील शेवटच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भुयारी मार्गातील सेवा रविवारी सुरू होत आहे. यामुळे वडगाव शेरी, येरवडा, पिंपरी चिंचवड, खडकी, कोथरूड परिसरातून शिवाजीनगर आणि शहराच्या मध्यवर्ती मंडई आणि स्वारगेट परिसरात येणार्या नागरिकांना विनाविलंब सेवा उपलब्ध होणार आहे.