कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा संशय; ईडी आणि गुन्हे अन्वेषण विभागात करणार तक्रार
प्रेस मीडिया लाईव्ह :
मावळ :- मावळ तालुक्यातील शिलिंब गावातील शेकडो एकर अकृषिक (एनए) जमिनीची फाईलच गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती अधिकारात उघड झाली आहे. प्रशासन आणि जमीनमालक यांच्या संगनमतानेच हा प्रकार झाल्याचा आरोप पतित पावन संघटनेचे मावळ तालुका संघटक अंकुश चोरगे यांनी केला आहे. यामध्ये कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा संशय निर्माण होत असून या प्रकरणी ईडी आणि गुन्हे अन्वेषण विभागात करणार तक्रार करणार असल्याचे चोरगे म्हणाले.
या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील शिलींब व चावसर या गावी शेकडो एकर जमिनीचे संकलन करून २००८ मधे मावळ तहसीलदार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडून अर्जदार रायटर लाइफस्टाईल प्रा लि, यांना अकृषिक परवानगी देण्यात आली. सदर प्रोजेक्ट मधे ९५ हेक्टर जागा एनए असताना ईसी आणि पीएमआरडीए ने १३१ हेक्टर वर प्लॅन मंजूर केला आहे आणि त्यावर रायटर लाइफस्टाईल प्रा लि यांनी पंचतारांकित हॉटेल उभारले आहे. यावेळी जमीन खरेदी करताना अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे अंकुश चोरगे यांनी म्हंटले आहे. शेकडो एकर जमिनीची अकृषिक परवानगीची मुख्य फाईल जिल्हाधिकारी महसूल कार्यालयाकडे नसल्याची माहिती प्रशासनाने माहिती अधिकारात दिली. तहसीलदार मावळ, नगर रचना पुणे ग्रामीण, पुणे महानगर विकास प्राधिकरण यापैकी कोणाकडेही अकृषक जमिनीची मुख्य फाईल शासकीय अभिलेखात नसल्याचे पत्र या सर्व विभागांनी दिले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन केले आहे, अनेक खरेदी खतांना शेतकरी पुरावा नसतांना ही पूर्ण क्षेत्र एनए करण्यात आले आहेत. तसेच अकृषिक परवानगी घेताना अनेक नियम धाब्यावर बसविण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे.
या प्रकरणातील प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तत्पर लक्ष न घातल्यास सदर विषयाची तक्रार ईडी ला आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ला करणार असल्याचे अंकुश चोरगे यांनी म्हटले आहे.