विवेकानंद कॉलेजमध्ये ‘वाड्मय मंडळ’चे उदघाटन उत्साहात संपन्न.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर दि. ०४/०९/२०२४ : सहित्य आणि समाज यांच्यात जिव्हाळ्याचा संबंध असतो. वाचन, लेखन आणि श्रवण यामधूनच मानवी समाज समृद्ध होत असतो. प्रेम हा मानवी संस्कृतीचा सारांश आहे. जगाला प्रेमाची गरज असते, त्यामुळे साहित्यिक साहित्यामधून प्रेमाची पखरण करीत असतो. समाजजीवनाला समजून घेतल्यास सकस साहित्यनिर्मिती करता येते. लेखन ही अत्यंत गांभीर्याने करण्याची गोष्ट असून भवतालाची जाणीव असल्यास उत्कृष्ठ साहित्यनिर्मिती करता येते. साहित्य हे नेहमी सत्याचा शोध घेत असते, असे प्रतिपादन प्रबोधन प्रकाशन ज्योतीचे संपादक मा. प्रसाद कुलकर्णी यांनी केले. ते विवेकानंद कॉलेजमधील ‘वाड्मय मंडळ’ च्या उद्घाटनप्रसंगी ‘साहित्याचे जीवनातील स्थान’ या विषयवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी, समाजाचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते. त्यामुळे वाचनातून समाज जाणीव निर्माण होते. ज्ञान आणि माहिती यामध्ये फरक आहे, समाजमाध्यामातून येणाऱ्या माहितीची खात्री करण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथाचे वाचन करणे गरजेचे आहे, असे मत मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्थाप्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वाड्मय मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. दीपक तुपे यांनी करून दिला. आभार प्रा. डॉ. कविता तिवडे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रमास डॉ. प्रदीप पाटील, डॉ. स्नेहा देसाई, प्रा. रोहिणी रेळेकर, प्रा. अश्विनी खवळे, प्रा. नम्रता ढाळे, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.