कोल्हापूर -पुणे वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात रेल्वे राज्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार - खासदार धनंजय महाडिक

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर - कोल्हापूर -पुणे वंदे  भारत एक्सप्रेस अत्यंत  आरामदायी, सुरक्षित आणि संपूर्ण वातानुकूलित अशा वंदे भारत एक्सप्रेस मधून, आता कोल्हापूर ते पुणे प्रवास करता येणार  असून १६ सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर, नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. 


आठवड्यातील तीन दिवस कोल्हापूर ते पुणे आणि अन्य तीन दिवस पुणे ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस, दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. तर प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी पुण्याहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस, सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात येईल. कोल्हापूरहून गाडी सुटल्यानंतर मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकांवर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा आहे. या वंदे भारत एक्सप्रेसला एकूण आठ डबे असतील. त्यामध्ये सात चेअर कार आणि एक एक्झिक्यूटिव्ह क्लास असेल. पाच डब्यांमध्ये प्रत्येकी ७८, तर इंजिन जवळच्या दोन्ही बाजूंच्या डब्यात प्रत्येकी ४४ आणि एक्झिक्युटिव्ह क्लास मध्ये ५२ आसन क्षमता अाहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या एका फेरीतून ५३० प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.  प्रति व्यक्ती ५६० रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह क्लाससाठी ११३५ रुपये इतके वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर आहेत. सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता, कोल्हापूर रेल्वे स्थानकावर, एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी  रेल्वे राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना, कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपात देशातील विविध मार्गांवर धावणार्‍या नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणार्‍या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होईल. सोमवारी सायंकाळी होणार्‍या या कार्यक्रमाला करवीरवासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन, खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

यावेळी सत्यजित उर्फ नाना कदम ,राहुल चिकोडे,सौ.रुपा निकम आणि राहुल चिकोडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post