परप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक , स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - अनोळखी परप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी आदिनाथ मारुती लोखंडे (वय 22.रा.हळदी कांडगाव ,सध्या क.सांगाव आणि सुहास बाळासो बिरांजे (वय 34रा.क.सांगाव जिरगे गल्ली )  यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक  करून त्यांना पुढ़ील तपासासाठी कागल पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अधिक माहिती अशी की ,शनिवार  (दि.14) रोजी कागल तालुक्यातील क.सांगाव मगदूम मळा परिसरात अनोळखी इसमाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती.या घटनेची माहिती  पोलिसांना समजताच कागल पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक दाखल होऊन पहाणी केली असता त्या इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.या घटनेचे गांभिर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांनी मयताची माहिती घेत असताना हा इसम  पंचताराकीत एमआयडीसी येथे असलेल्या रेमंण्ड़ चौकातील सुदर्शन जिन्स कंपनीत बॉयलर डिपार्टमेंटला कामगार असून तेथेच कामगार रुम मध्ये रहात असल्याची माहिती मिळाली.त्याचे नाव विकाससिंह  (रा.ग्राम सिल्वर पो.गौजावर मध्यप्रदेश राज्य) त्याच गावचा त्याचा साथीदार विरेंद्र कुमार कुशावह यांनी यानी दिलेल्या फिर्यादीत अनोळखी इसमाने डोक्यात दगड घालून खून करून त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नॉयलॉन दोरीने बांधून झुडपात टाकल्याची माहिती दिली.

या पथकातील पोलिसांनी शोध घेत असताना त्यांना कागल येथील कं.सांगाव येथे रहात असलेल्या दोघांनी खून केल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कं.सांगाव येथील जिरगे गल्लीतील आदिनाथ मारुती लोखंडे आणि सुहास बाळासो बिरांजे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली असता त्यांना अटक करून पुढ़ील तपासासाठी कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे   उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर  स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक संदिप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post