प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. ३ क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पहाडी व्यक्तिमत्व, समाज जीवनाच्या डोळस दर्शनातून तयार झालेली समतावादी- समाजवादी विचारधारा, त्यावर आधारित प्रतिसरकारची चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळात नव्या भारताची मांडणी करण्यासाठी उभे आयुष्य खर्च करणाऱ्या क्रांतिसिंहांचा जीवनसंघर्ष अतिशय प्रभावीपणे प्रा .नवनाथ शिंदे यांनी सादर केला.' क्रांतिसिंह नाना पाटील' हा एकपात्री प्रयोग क्रांतिसिंह नाना पाटील यांचे १२५ वे जन्म वर्ष आणि समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस, ज्येष्ठ विचारवंत स्वातंत्र्य सैनिक आचार्य शांतारामबापू गरूड यांचा १३ वा स्मृतिदिना
निमित्त समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित केला होता. प्रारंभी जयकुमार कोले यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून क्रांतिसिंह आणि आचार्य शांताराम बापू यांच्या ऋणानुबंधाचा उल्लेख केला.
प्रा.नवनाथ शिंदे यांनी सव्वा तासाच्या या एकपात्री प्रयोगामध्ये क्रांतिसिंहांचे बालपण ,त्यांची कौटुंबिक परिस्थिती, सत्यशोधक विचारधारेचे संस्कार ,महात्मा गांधींच्या प्रभावाने तलाठ्याची नोकरी सोडून देऊन स्वातंत्र्य आंदोलनात घेतलेली उडी,गावोगावी स्वतः दवंडी देत स्वतःच्या घेतलेल्या सभा, गावरान , रांगड्या भाषेत केलेले जनजागरण व प्रबोधन,ब्रिटिश सरकारने घर -जमीन जप्त केले तरी त्यांच्यापुढे नमते न घेणारे क्रांतिकारक ,सामाजिक सुधारणांवर भर देण्याची भूमिका, स्वच्छता- व्यसनाधीनता- विषमता- जातीभेदातील अर्थहीनता -अर्थसाक्षरता -अंधश्रद्धा - नशिबापेक्षा कष्टाचे महत्त्व- वतनदारीचे शोषण -सत्याग्रहाचे मार्ग- प्रतिसरकारमधील कार्य, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी ,क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड यांच्यासह अन्य तरुण साथीदारांबरोबर असलेले ऋणानुबंध ,सातारा व बीड मधून लोकसभेवर निवडून जाणे आणि लोकसभेमध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, भूमीहीनांसाठी विधेयके मांडणे, आपल्या कामाचा ठसा लोकसभेवर उमटवणे, समाजवादी समाज रचनेवर अव्याहत निष्ठा ठेवून संपूर्ण आयुष्य खर्च करणे या आधारे क्रांतिसिंहांचा जीवनपट आणि विचारपट अतिशय सक्षमपणे उभा केला. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पुढील अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरेल असा मौलिक विचारांचा आणि कृतीकार्याचा ठेवलेला ठेवा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम या प्रयोगातून दिसून आले. या कार्यक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. देवदत्त कुंभार यांनी आभार मानले.