प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी, ता. २४ डोळस व सम्यक दृष्टी ठेवत समाजजीवनातील विविध घडामोडींवर तटस्थपणे वृत्तपत्र पत्रलेखक मांडणी करीत असतात. संविधानातील मूलभूत अधिकारांचे रक्षण करत त्याचा प्रसार व प्रचारही करतात.वृत्तपत्र पत्रलेखन ही समाजाची गरज असून लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी व ती वृध्दींगत होण्यासाठी पत्रलेखकांनी विविध विषयांवर लिहीत राहिले पाहिजे.
वृत्तपत्रातील पत्रलेखकांचे स्थान हे स्वयंभू आहे. तसेच हे चिरकाल टिकेल व वाढेल. वृत्तपत्र लेखक संघाचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. असे काम वाढत्या श्रेणीने सलग असे दीर्घकाळ वर्षे चालवणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे.लोकप्रबोधन व जनजागरण याबाबत वृत्तपत्र पत्रलेखक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात.समाजवादी प्रबोधिनी सारखी महाराष्ट्रातील मान्यवर संस्था या संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे.असे मत ज्येष्ठ पत्रकार निखील पंडितराव यांनी व्यक्त केले.ते वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत पत्रलेखक मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी पोलीस उप अधिक्षक समीरसिंह साळवे होते. यावेळी वृत्तपत्र पत्र लेखिका माधुरी कुंभीरकर (गडहिंग्लज) लिखीत प्रकाशित झालेल्या `मत - मतांतरे` या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात.प्रास्ताविक वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी केले. संघाच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. निखिल पंडितराव व समरसिंह साळवे यांचा सत्कार अनुक्रमे जयकुमार कोले व प्रसाद कुलकर्णी यांनी शाल, ग्रंथ व गुलाबपुष्प देवून केला. यावेळी माधुरी कुंभीरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
निखिल पंडितराव म्हणाले, पत्रलेखक हा वृत्तपत्रातील महत्वाचा घटक आहे. समाज आणि वृत्तपत्रे यांच्यातील महत्वाच दुवा म्हणून तो काम करीत असतो. संपादकीय पानावर त्यांचे सर्वोच्च स्थान असून कमी शब्दात अधिक व्यापकपणे ते व्यक्त होत असतात. विचार पेरण्याचे आणि देण्याचे काम त्यांच्याकडून सतत होत आहे. वाचकांचे प्रतिनिधीत्व करीत वाढत्या ध्रुवीकरणासह परखड मते व्यक्त केली जातात. तटस्थ मांडणी आणि चळवळींना बळ देत चुकीच्या गोष्टीवर ते प्रहार करीत डाॅक्टरांसारखे उपाय शोधण्याचे काम करीत असतात. वास्तवाचे भान जमिनीवर आणण्यासाठी लक्षवेधी मांडण्याचे काम त्यांच्याकडून होत असते.
अध्यक्षस्थाना वरुन बोलतांना पोलीस उप अधिक्षक समीरसिंह साळवे म्हणाले,पत्रलेखनासाठी वृत्तपत्रात जागा कमी असतांनाही वृत्तपत्र पत्रलेखक सतत लिहीत राहतात. यातून त्यांची समाजाविषयी तळमळ आणि सजगता बारकाईने दिसून येते. विचारांच्या खोलीतून सर्वंकश मांडणी करुन पत्रलेखक स्वतःची भूमिका मांडतात. समाज माध्यमावरील लिखाणाची केवळ लोकप्रियता राहते. पण पत्रलेखकांच्या पत्राची दखल समाज नेहमीच घेतो. मी आणि माझं लेखन याबाबत विश्वासार्हता जपणा-या पत्रलेखकांनी येणा-या काळ्यात काय वाचावे, याबाबत जागृती करावी.या कार्यक्रमाच्या आयोजनात पंडीत कोंडेकर,रमेश सुतार, संजय भस्मे, अभिजीत पटवा, दीपक पंडित, बाळासाहेब नरशेट्टी, महेंद्र जाधव,अन्वर पटेल आदींचा सहभाग होता.समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास बंडोपंत कुंभीरकर, रामदास कोळी, नौशाद जावळे, बजरंग लोणारी, अशोक केसरकर, देवदत्त कुंभार, वामन साळवे, सचिन पाटोळे , नुरूद्दीन काझी, धनंजय सागावकर, अनिल होगाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वृत्तपत्र लेखक उपस्थीत होते. नारायण गुरबे यांनी आभार मानले.
`