प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरातील सांगली रोड येथील ऋतूराज कॉलनी मधील नागरिकांच्या कडून आपल्या परिसरातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वखर्चाने तसेच महानगर पालिकेच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविणेत येतात. या अनुषंगाने गेल्या काही वर्षांपासून ऋतूराज कॉलनी मधील नागरिक पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत आहेत.यामध्ये प्रामुख्याने येथील नागरिक हरित, स्वच्छ आणि सुंदर कॉलनी त्याचबरोबर गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीसह सर्वच नागरीक आपल्या घरी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून स्वखर्चाने बनविलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडातच सर्व गणेश मूर्तीचे विसर्जन करतात.
यावर्षीच्या घरगुती गणेश मूर्ती विसर्जन कार्यक्रमासाठी कॉलनी मधील नागरिकांनी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांना सदर कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. यावेळी आयुक्त यांच्या हस्ते गणेश मूर्ती कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन कार्यक्रमाचा शुभारंभ करणेत आला.
यावेळी माजी नगरसेवक आणि कॉलनी मधील रहिवासी असलेले मदन कारंडे यांनी कॉलनी मध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने या परिसरात जवळपास १५०० झाडे लावलेली असुन त्यांचे संगोपन अत्यंत योग्य पद्धतीने करणेत येत आहे. संपूर्ण परिसर हरीत असलेने या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात तसेच या परिसरात अनेक मोर मुक्त पणे संचार करत असतात.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी ऋतू राज कॉलनीमध्ये राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण पूरक उपक्रमांचे कौतुक करुन या कॉलनी मध्ये राबविण्यात येत असलेले उपक्रम संपूर्ण शहरासाठी आदर्शवत राहतील असे गौरवोद्गार काढले.तसेच आपल्या कॉलनी मधील रहिवासी यांनी संपूर्ण शहरात पर्यावरण पूरक उपक्रम राबविणेकामी सहकार्य करावे असे आवाहन केले.
या प्रसंगी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अभिजित पटवा यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना कॉलनीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल पाटील यांनी सुत्रसंचलन सुनिल म्हेत्रे तर आभार प्रदर्शन सुरेश कुंभार यांनी केले.
यावेळी कॉलनीचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी तसेच कॉलनीचे जेष्ठ सदस्य राजेंद्र पाटोल विजय देसाई कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबिया सह उपस्थित होते.