प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणातील बदल विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियान राबविणेत येते.सन २०२३-२४ या वर्षामध्ये माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये नागरि स्थानिक स्वराज्य संस्था गटामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेस राज्य स्तरावर तिसरा क्रमांक मिळविला असून इचलकरंजी महानगरपालिकेस चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असून लवकरच सदर बक्षीसाची रक्कम कार्यक्रमाद्वारे प्राप्त होणार आहे.
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित "माझी वसुंधरा अभियान ४.०" हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले.
या दोन्ही प्रकारातील मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ४.० मधील लोकसंख्या निहाय १२ गटातील विजेते जाहीर करण्यात आलेले आहेत.या अनुषंगाने १ ते ३ लाख लोकसंख्या गटात इचलकरंजी महानगरपालिकेने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे.