साने गुरुजींचे ' स्त्री-जीवन 'हे पुस्तक "मूलभूत आदर्शांची संस्काराची, शिकवण देते -ज्येष्ठ लेखिका निलम माणगावे

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२८ साने गुरुजींनी तत्त्वज्ञानापासून बाल साहित्यापर्यंतचे विविध स्वरूपाचे प्रचंड लेखन ग्रंथरूपाने केले. १९४० साली प्रकाशित झालेले ' स्त्री- जीवन 'हे त्यांचे पुस्तक म्हणजे गुरुजींच्या मातृहृदयी संवेदनशील मनाचा एक आगळावेगळा आविष्कार आहे. ओवी वांग्मयात स्त्रियांनी आत्मा ओतला आहे. स्त्रीच्या व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक पातळीवरचे जिव्हाळ्याचे प्रश्न कमालीच्या नेमक्या स्वरूपात ओव्यांमधून मांडले जातात. या ओव्यातून व्यक्त झालेला आशय पुढील पिढीपर्यंत जाणे गुरुजींना आवश्यक वाटले. त्यामुळेच त्यांनी हे संकलन केले. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान वाटचालीमुळे भौतिकदृष्ट्या काही सोयी ,सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र माणूस मानसिक दृष्ट्या फार मोठा बदललेला नाही. उलट माया, ममता, त्याग ,प्रेम या भावना कमी होऊन समजूतदारपणा कमी होत आहे.अशावेळी साने गुरुजींचे हे पुस्तक मूलभूत आदर्शांची संस्काराची, शिकवण देते त्याचे महत्त्व मोठे आहे,

असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका निलम माणगावे (जयसिंगपूर ) यांनी केले.त्या साने गुरुजी यांच्या एकशे पंचविसाव्या जन्मवर्षानिमित्त व्याख्यानात " साने गुरुजींचे ' स्त्री-जीवन 'हे पुस्तक " या विषयावर बोलत होत्या. हे व्याख्यान साने गुरुजी समविचारी मंचच्या वतीने आणि समाजवादी प्रबोधिनीच्या सहकार्याने आयोजित केले होते. स्वागत अशोक केसरकर यांनी केले. संजय रेंदाळकर यांनी प्रास्तविक केले.


नीलम माणगावे पुढे म्हणाल्या, स्त्रीच्या भावविश्वाशी निगडित असलेल्या या ओव्यांमधून व्यक्त होणाऱ्या दिव्यतेला व माधुर्याला सीमा नाही. या ओव्या मानवी मन आणि निसर्ग यांची नाळ जोडण्याचे फार मोठे काम करतात. आज समाज माध्यमांपासून असलेली सारी व्यसन माणसाचं पर्यायाने स्त्रीचं कासावीसपण वाढवत आहेत. जन्मापासूनच स्त्री समोर उभे राहणारे प्रश्न वाढतच चाललेले आहेत.अशावेळी मुलींनी आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे आणि कुटुंबीयांनी तसे वातावरण निर्माण करून दिले पाहिजे. चिमुरडीवरील अत्याचारापासून ऑनर किलिंग पर्यंतच्या घडणाऱ्या घटना हे सुदृढ समाजाचे लक्षण नाही. म्हणून समाज सुदृढ करायचा असेल तर गुरुजींच्या स्त्री जीवन या पुस्तकाचा व त्यातील ओव्यांचा अन्वयार्थ समजून घेतला पाहिजे. नीलम माणगावे यांनी आपल्या एक तासाच्या भाषणामध्ये या पुस्तकाविषयी ,त्यातील ओव्या विषयी आणि समकालीन स्त्री प्रश्नांविषयी अभ्यासपूर्ण भाष्य केले. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानास रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनिल होगाडे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post