प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी दि.१७ लोकशाही नीतिमत्तेची तोडफोड करणारे आणि संविधानाचा अपमान करणारे विसंगत विचार करणाऱ्या राजकीय पक्षांना व नेत्यांना राजकारणातून हद्दपार केले पाहिजे. समानतेचे सामाजिक मूल्य वाढवत नेण्यासाठी आता युवा वर्गच प्रभावी काम करू शकेल.धर्मांध व जातीय विष कालवणारे हात व त्यामागची डोकी ओळखायची असतील तर मुस्लिम कट्टरवाद, हिंदुत्ववादी कट्टरवाद असा कोणताच कट्टरतावाद चालणार नाही अशी ठाम भूमिका घेणाऱ्या नागरिकांची देशाला गरज आहे असे परखड मत संविधान विश्लेषक ऍड .असीम सुहास सरोदे यांनी मांडले.असे प्रतिपादन संविधान व नागरिक हक्क कार्यकर्ते व ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. असीम सुहास सरोदे यांनी केले. ते माजी आमदार देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राहुल खंजिरे फाउंडेशन व समाजवादी प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात 'नागरिकांसाठी संविधान 'या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजवादी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रताप होगाडे होते. राहुल खंजिरे यांनी प्रास्ताविक केले व त्यातून या कार्यक्रमाचे आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी मंचावर मदन कारंडे, शामराव कुलकर्णी माजी आमदार राजीव आवळे, अब्राहाम आवळे, सयाजी चव्हाण, प्रमोद खुडे, जयकुमार कोले,बाबासो कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशाचे ज्येष्ठनेते कॉ. सिताराम येचुरी यांना आदरांजली वाहण्यात आली.
ऍड.सरोदे पुढे म्हणाले,सर्वांगीण विकास आणि सर्वांना सामान संधी मिळावी यासाठी आरक्षणाची योजना वंचित व कमजोर वर्गाच्या प्रतिष्ठेसाठी महत्वाची आहे व जोपर्यंत भारतात संपूर्ण समानता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आरक्षण आरक्षण कायम राहील असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी. सामाजिक,राजकीय व आर्थिक विषमता मिटविण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे. संविधान व लोकशाहीपेक्षा कोणताच व्यक्ती किंवा राजकीय पक्ष व धर्म-जात श्रेष्ठ नाही असा विचार करणाऱ्या एकत्रित नागरी शहाणपण असणाऱ्या मतदारांची लोकशाही वाट बघतेय. भारताचा विकास फक्त संविधानावरच शक्य आहे. राजकारणामध्ये संविधानिक नैतिकता जोपासणे अत्यंत गरजेचे आहे . जात्यांध व धर्मांध राजकारणाने समाजातील प्रेम भावना नष्ट करून विषारीपणा पेरण्याचा प्रयत्न केला आहे.पणअधर्माला धर्म म्हणून प्रस्थापित करणाऱ्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे.जात व धर्मावर आधारित दूषित वातावरणाची समाज म्हणून आपल्यालाही लाज वाटली पाहिजे. आमच्या मेंदूत भुसा कोण भरते आहे याचा विचार करून धर्माच्या नावावर मतं मागणाऱ्यांना हरवणे गरजेच आहे.संविधानिक मूल्ये जीवन जगण्याचा आधार असली पाहिजेत हे आपण सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. कारण शेवटी हे संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकाचे अर्थात आम्हा भारतीयांचे संविधान आहे ,
ऍड.सरोदे पुढे म्हणाले,हिंदू धर्म सहिष्णुता शिकविणारा धर्म आहे तर मुस्लिम धर्मातही शांततेचा संदेश देण्यात आलेला आहे. पण धर्माच्या नावावर दहशत निर्माण करणे, सामाजिक तेढ निर्माण ही धर्मांधांची राजकीय गरज आहे. त्यामुळे धर्माच्या आणि जातीच्या नावावर समाजात दुफळी निर्माण होईल अशी परीस्थिती काही पक्ष जाणीवपुर्वक निर्माण करीत आहेत. हे समाजाने ओळखून अशा वृत्तीना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. आपली जात- धर्म घरात ठेऊन आपण समाजात वावरत संविधानाला अपेक्षित असणारी समानता हा आपल्या जीवनाचा आधार बनविला पाहिजे . कोणत्याही प्रकारचा कट्टरतावाद संविधानाला अपेक्षित नाही. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार यासारख्या तत्त्वाचा लाभ घेत भेदभावरहित समाजाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. युवक- युवतींनी राजकीय पक्षांची नैतिकता तपासूनच मतदान केले पाहिजे. जे पक्ष संविधानाची चौकट मोडून काढण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करीत आहेत त्यांना ठाम नकार दिला पाहिजे.
यावेळी बोलताना राहुल खंजिरे म्हणाले म्हणाले, राहुल खंजिरे फाउंडेशनच्या वतीने समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तळागाळातील माणसाचे प्रश्न घेऊन समाजकार्य करीत असतानाच इचलकरंजी मधील सामाजिक आणि धार्मिक सौहार्द बिघडणार नाही यासाठी जनमानसात संविधानिक मूल्यांची पेरणी करण्याचे काम राहुल खंजिरे फाउंडेशन च्या माध्यमातून करत आहे. समाजवादी प्रबोधिनी ही संस्थाही गेली पाच दशके संविधानांच्या विचाराचा जागर करत आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणात व राजकारणात संविधानाचे तत्त्वज्ञान अग्रक्रमावर आणण्याचा काम प्रबोधिनीने पहिल्यापासून केले आहे.आजही सातत्याने विविध उपक्रमांद्वारे करत आहे.यावेळी बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त इचलकरंजी शहरात विविध महाविद्यालयात अध्ययन करीत असलेल्या विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी राहुल खंजिरे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आभार रोहित पालके यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. एफ. एन. पटेल व सौ बिरनाळे मॅडम यांनी केले.