शहीद भगतसिंग : विवेकवादी मार्क्सवादी विचारवंत

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.com


२८ सप्टेंबर हा सर्वांगीण शोषणाविरुद्ध लढणारा एक लढवय्या, विवेकवादी मार्क्सवादी तरुण विचारवंत शहीद भगतसिंग यांचा जन्मदिन. १९०७ साली जन्मलेले भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी २३ मार्च १९३१ रोजी सुखदेव व राजगुरू या आपल्या सहकाऱ्यांसह फाशी गेले. जवळजवळ शतकभर भगतसिंग हे जगभरच्या तरुणांचे आयडॉल म्हणून ओळखले जातात. शहीद भगतसिंग नव्या समतावादी समाजाचे स्वप्न पाहत होते. देशभक्तीने आणि स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनाने प्रेरित झालेल्या, त्यात सक्रिय सहभागी असलेल्या शेतकरी कुटुंबात ते जन्मले. विद्यावती व किशनसिंग हे त्यांचे माता-पिता. वडील किशनसिंग लाला लजपत राय यांच्याबरोबर तुरुंगवास भोगलेले. तर त्यांचे काका अर्जुनसिंह हे मोठे नेते होते.


सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण बंग या त्यांच्या जन्मगावी झाले. महाविद्यालय शिक्षण लाहोरला झाले.लाहोरच्या डीएव्ही कॉलेजात त्यांनी विद्यार्थी संघटना बांधली.आणि आजन्म अविवाहित राहून देशसेवेचे व्रत घेतले. प्रारंभी काँग्रेसमध्ये काही काळ राहिल्यानंतर ते त्यातून बाहेर पडले.त्यांच्यावर गदरची क्रांतिकारी चळवळ आणि कार्ल मार्क्स व लेनिन यांचे तत्त्वज्ञान यांचा मोठा प्रभाव होता. कार्ल मार्क्स यांचे 'दास कॅपिटल ' आणि 'कम्युनिस्ट जाहीरनामा 'याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळेच त्यांना केवळ स्वातंत्र्य नको होते, तर समाजवादी क्रांती घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न होते . शोषण रहित समाज जीवनाची निर्मिती करण्याचे भव्य उद्दिष्ट त्यांनी ठेवले. त्यांनी जे लेखन केले, जी भाषणे केली व जी जीवनशैली स्वीकारली त्यातून ते स्पष्ट होते. त्यांनी चंद्रशेखर आजाद, सुखदेव ,बटुकेश्वर दत्त, भगवतीचरण वर्मा , जतींद्रदास आदींच्या साहाय्याने ' नौजवान भारत सभा '. त्याद्वारे क्रांतिकार्याला सुरुवात केली. माणसामाणसातील शोषण दूर करणे आणि किसान व कामगारांचे राज्य आणणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट होते.


खटल्यातील बंदिंची तुरुंगातून सुटका करणे ,सायमन कमिशनला विरोध करणे ,शस्त्रे जमा करणे, महत्त्वाच्या केंद्रात बॉम्ब तयार करणे ही कामे नौजवान सभेद्वारे सुरू होती. १९२६  साली दसऱ्याला लाहोर मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात भगतसिंगाना पकडले. परंतु पुराव्या अभावी त्यांना सोडून दिले. लाला लजपतराय यांच्यावर हल्ला करणाऱ्या स्कॉटला धडा शिकवायचा म्हणून केलेल्या गोळीबारा सँडर्स हा अधिकारी मारला गेला. भगतसिंग फरारी होऊन कलकत्ता ,आग्रा, लाहोर, दिल्ली असे फिरत राहीले.


८ एप्रिल १९२९  रोजी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ट्रेड डिस्पुट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल मांडले होते.त्याचा निषेध म्हणून प्रेक्षक सज्जातून भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब फेकले .आणि इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देत पत्रके फेकली. हा बॉम्ब हिंसा करणारा नव्हता तर मोठा आवाज करणार होता.त्या पत्रकात लिहिले होते ,'बहिऱ्या झालेल्यांसाठी हा मोठा आवाज. मानवाकडून मानवाचे शोषण नको. खऱ्याखुऱ्या  स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान देऊ.' या प्रकरणात भगतसिंग पकडले गेले. १२ जून १९३० रोजी त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली. पण पुढे खास न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. आणि २३ मार्च १९३१ रोज भगतसिंग, सुखदेव व राजगुरू हे देशासाठी शहीद झाले.


 तत्त्वनिष्ठ आणि साम्राज्यवाद विरोधी कोठोर भूमिका भगतसिंग घेत होते.शेवटी फासावर जातानाही ते कॉ. लेनिन यांचे पुस्तक वाचत होते.' एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारक भेटतो आहे हे त्यांचे वाक्य होते. देशासाठी हसत हसत फासावर जाणारा हा वीर माझ्या सुटकेसाठी ब्रिटिशांची याचना करू नका असे सांगत होता. तर मृत्यूनंतर डोळ्यात अश्रू ही आणू नका कारण मी माझे कर्तव्य करतो असे सांगत होता.कमालीचे बुद्धीप्रमाणे वादी असलेले शहीद भगतसिंग म्हणजे  आंतरबाह्य सर्वार्थाने महामानव होते.भगतसिंग हे तडफदार पत्रकारही होते. अर्जुन ( दिल्ली) आणि प्रताप (कानपूर) आदी काही नियतकालिकातून ' बसवंतसिंह' या टोपण नावाने त्यांनी लेखन केले होते.तसेच अमृतसर मधून प्रकाशित होणाऱ्या अकाली व कीर्ती या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले होते.


'मी नास्तिक का आहे ? या छोट्याशा पुस्तिकेत त्यांनी आपले विवेकवादी विचार मांडले आहेत. विवेकवादी विचारांचा पुरस्कार पुरस्कर्ता बनतांना भगतसिंग यांनी देव,धर्म ,श्रद्धा, अंधश्रद्धा यांचा बारकाईने व चिकित्सक दृष्टीने अभ्यास केला होता. ते म्हणतात,' देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी स्वतःची कल्पना अशी आहे की, माणसाच्या मर्यादा ,दुबळेपणा, त्रुटी यांची झालेली जाणीव विचारात घेऊन सर्व परिस्थितींना धैर्याने तोंड देण्यासाठी ,सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालून त्याच्या वागण्यावर ताबा ठेवण्यासाठी, देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले. देवाला दयाळू व वात्सल्यमूर्ती वर्णिल्याने तो पिता, माता, भगिनी, बंधू, मित्र मदतनीस अशा स्वरूपात सर्वांना उपयोगी पडू लागला.'


अंधश्रद्धा मेंदू शिथिल करतात आणि माणसाला प्रतिगामी बनवतात. म्हणून जो मनुष्य स्वतःला वास्तववादी म्हणवतो त्याने संपूर्ण सनातन धर्मश्रद्धेला आव्हान दिले पाहिजे. विवेक बुद्धीच्या प्रखर हल्ल्याला ती अंधश्रद्धा तोंड देऊ शकली नाही तर ती कोसळून पडेल असे भगतसिंगांचे मत होते.ते म्हणतात ,' जर ही पृथ्वी किंवा हे विश्व त्या सर्वव्यापी सर्वज्ञ सर्वशक्तीमान अशा विधात्याने निर्माण केले असेल तर त्यांनी मुळात ते सर्व का निर्माण केले ? दैन्य आणि यातनानी भरलेले जग, लाखो-शोकांतिकांची ही सतत बदलती, पण चिंतनगुंफण ,त्यात एकही प्राण मात्र सर्वार्थाने समाधानी नाही, हे सर्व त्याने का निर्माण केले ? कृपा करून हाच त्यांचा कायदा आहे असे म्हणू नका. जर तो नियमाने आणि कायद्याने बांधलेला असेल तर तो सर्वशक्तिमान नाही. तो आपल्यासारखाच गुलाम आहे. कृपाकरून ही त्याची आनंदक्रीडा आहे असे म्हणू नका.'


ज्या राजकीय स्वातंत्र्यासाठी भगतसिंग शहीद झाले त्याला अनुसरून काही प्रश्न ते उपस्थित करतात.ते म्हणतात,' पाप किंवा गुन्हा करणाऱ्याला सर्वशक्तिमान ईश्वर परावृत्त का करत नाही ? युद्ध पेटवणाऱ्या सत्ताधीशांना त्याने ठार मारले नाही किंवा त्यांच्यातील युद्धाची उर्मी का काढली नाही? महायुद्धाने मानव जातीवर कोसळणारी आपत्ती त्याने का टाळली नाही? भारताला स्वतंत्र करण्याची भावना तो ब्रिटिशांच्या मनात का निर्माण करत नाही ?उत्पादनाच्या साधनांवरचा आपला वैयक्तिक मालकी हक्क सोडावा अशी  परोपकारी भावना तो सगळ्या भांडवलदारांच्या मनात का रुजवत नाही ?सर्वसाधारण लोककल्याण हा समाजवादाचा लाभ आहे असे लोक मान्य करतात. पण तो अव्यवहार्य आहे या सबबीखाली त्याला विरोध करतात. मग त्याला मध्यस्थी करू द्या आणि व्यवस्थितपणे रचना करू द्या. असे प्रश्न उभे करुन भगतसिंग यांनी हे जग दैवी नव्हे तर वैज्ञानिक शक्तीवर, मानवी शक्तीवर चालले आहे हे स्पष्ट केले.


भगतसिंग म्हणतात की,' श्रद्धा संकटाची ,कष्टाची तीव्रता कमी करते किंबहुना या गोष्टी सुखावहसुद्धा करते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व आधार मिळतो.त्याच्याशिवाय माणसाला स्वतःवरच अवलंबून रहावे असते. वादळ आणि तुफानामध्ये फक्त स्वतःच्या पायावर उभे राहणे हा पोरखेळ नव्हे.अशा कसोटीच्या क्षणी गर्व जर असेलच तर तो पार वितळून जातो. आणि माणूस तर इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्धाला बेदरकारपणे धुत्करू शकत नाही.आणि जर त्याने असेच केले तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की आपली त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे.' ही शक्ती म्हणजेच विवेकवादाची शक्ती असे भगतसिंग मानत होते.


विवेकदाचे मूलभूत विचार मांडून भगतसिंग शेवटी म्हणतात,' मला चांगली कल्पना आहे की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी काढली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा यांचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्य दिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले.'


माणसाने विवेकनिष्ठ जगणे सोपे नाही. अंधविश्वासापासून समाधान किंवा आधार मिळवणे सोपे आहे.परंतु निरंतर विवेकनिष्ठ आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे असे भगतसिंगांचे मत होते. शास्त्रांची प्रगती होत असताना, शोषित घटक स्वतःच्याच मुक्तीसाठी स्वतः संघटित संघर्ष करत असताना परमेश्वर रूपी काल्पनिक पात्राची आवश्यकता भगतसिंगाना वाटत नव्हती .आत्ममुक्तीच्या लढ्यात धर्माच्या संकुचित कल्पनेविरुद्ध आणि देवावरच्या विश्वासाविरुद्ध लढणे त्यांना आवश्यक वाटत होते. भगतसिंग म्हणतात,' जो माणूस प्रगतीच्या बाजूचा आहे त्याने जुन्या श्रद्धेच्या प्रत्येक बाबीबाबत टीका करायला हवी. अविश्वास दाखवायला हवा.तिला आव्हान द्यायला हवे. प्रचलित श्रद्धेच्या अगदी कानाकोपऱ्याचे सुद्धा एक एक करून विश्लेषण करायला हवे.'

भगतसिंग हे कॉ.लेनिन यांना आपला राजकीय व वैचारिक गुरु मानत होते हे ध्यानात घेतले पाहिजे. शहीद भगतसिंग हे संपूर्ण भारतीय सर्वकालिक प्रेरणास्त्रोत आहेत.त्यांची विचारधारा समजून घेऊन वर्तन व्यवहार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post