प्रेस मीडिया लाईव्ह :
गडहिंग्लज ता.१,ब्रिटिश राजवटीच्या सर्वांगीण शोषणाविरुद्ध भारतात वैचारिक जागरणाला सुरुवात झाली.त्याला आधुनिक भारतीय प्रबोधन असे म्हणतात.या नव्या जनजागरणाचे उद्गाते स्वामी विवेकानंद होते.धर्म आणि राजकारण यांचे एकत्रिकरण झाले तर आपली अधोगती आढळ आहे. जगाचे नुकसान आंधळ्या धर्मवेडामुळे झालेले आहे.
माणसा माणसातील अंतर वाढवणारी जात व्यवस्था अर्थशून्य आहे. केवळ देव देव करत राहू नका तर विज्ञानाने जमीन नांगरा. सर्वसामान्यांची उपेक्षा हे राष्ट्रीय महापाप आहे. प्रत्येक कामात माणुसकी म्हणजेच ईश्वर प्रगट व्हायला हवी.अंत:करणातील अहंकाराचा निचरा करणे हेच खरे धर्मतत्त्व आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक असे म्हणत स्वतःला समाजसत्तावादी म्हणून जाहीर करणारे स्वामी विवेकानंद यांचे सामाजिक ,राजकीय व धार्मिक विचार भारताच्या सुदृढ वाटचालीसाठी आजही अतिशय उपयुक्त आहेत. स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वाटचालीनंतर स्वातंत्र्याच्या शताब्दी कडे जात असताना स्वामी विवेकानंदांचे विचार स्वीकारून तशी वाटचाल करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते दिनकरराव शिंदे स्मारक ट्रस्टच्या डॉ. ए.डी.शिंदे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे आरंभ कार्यक्रमात'स्वामी विवेकानंद जीवन व विचार 'या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव स्वाती महेश कोरी होत्या. मंचावर सहवक्ते विनोद शिंत्रे, महेश कोरी, प्राचार्य डॉ.डी.व्ही घेवडे, उपप्राचार्य के. एस. जोशी, प्रा.शिवाजी होडगे उपस्थित होते. प्रारंभी दिनकरराव शिंदे, डॉ.ए.. डी. शिंदे आणि ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रा. आर. व्ही. सव्यानावर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.यावेळी अमेरिकेत कार्यरत असणाऱ्या विनोद शिंदे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर मनोगत व्यक्त केले. तसेच महेश कोरी आणि प्राचार्य डॉ.डी.व्ही.घेवडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्माची सार तत्वे गुंफून नववेदांत मांडला.सत्य हाच नववेदांताचा परमेश्वर आहे.ब्रह्म सत्य जगत मिथ्या हे बरोबर नाही. ऐहिकतेकडे दुर्लक्ष करू नका, ऐहिक जीवनात सेवाभाव जपा. आसक्ती विहित जगा. दरिद्री नारायणाची सेवा हाच धर्म आहे. दुसऱ्या माणसासाठी अंतकरण द्रवत नाही तो देश आणि तो धर्म दुर्दैवी असतो. धर्म बाह्य जगाकडे उदात्त दृष्टीने पाहण्या ऐवजी स्वयंपाक घरातील भांड्यात शिरला आहे.त्यामुळे ज्ञानमार्ग आणि बुद्धिमार्गाचे दरवाजे बंद झाले आहेत. स्त्रियांना समतेने वागवले तरच देशात आणि जगात समता नांदेल. मानवी संस्कृतीच्या उत्कर्षात श्रमाचे महत्त्व मोठे आहे असे विवेकानंद यांचे मत होते. विवेकानंदांचा नववेदांताचा विचार, धर्माचा आदर्श व्यवहार ,नर नारायण सेवा, सर्वधर्म समान ,जनतेत जनार्दन पाहणे असे सर्वच विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून विवेकानंदांच्या विचाराचे समकालीन व भविष्यकालीन महत्व अधोरेखित केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना स्वाती महेश कोरी म्हणाल्या, जात-पात धर्म यापासून मानव मुक्तीचा संदेश स्वामी विवेकानंद दिला. तोच समता वादाचा विचार माझे वडील कालवश श्रीपतराव शिंदे साहेबांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. माझ्या जन्मदाखल्याच्या जात धर्म रखान्यात भारतीय असाच शब्द आहे याचा मला अभिमान आहे. स्वाती कोरी यांनी आपल्या अध्यक्षिय समारोपात दिनकरराव शिंदे स्मारक ट्रस्टच्या शैक्षणिक वाटचालीची दिशा स्पष्ट केली.महाविद्यालयाच्या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास इंजिनिअरिंग कॉलेजचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.पी. टी. कोकितकर यांनी आभार मानले.