प्रेस मीडिया लाईव्ह :
बेडकिहाळ प्रतिनिधी -डॉ विक्रम शिंगाडे
बेडकिहाळ येथे मंगळवारी रात्री नारे कार गॅरेज मधील गाडीसह तीन दुकानातील रोकड लंपास करन्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात बेडकिहाळ येथील बीग मार्ट मधुन 30 हजार रुपये चोरी झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच कार सह तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
बेडकिहाळ सर्कल ते दूधगंगा नदी रस्ता या मार्गावरील नारे कार गैरजच्या दारात लावलेली ६० हजारांची कार, बेडकिहाळ ते शांतीनगर सर्कल मार्गावरील सुपर बाजाराच्या गल्ल्यातील २० हजार, सर्कलपासून नदी रस्ता मार्गावरील सागर आप्पासाहेब अलगुरे यांच्या किराणा दुकानातील ३ हजार असा ८३ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. नारे कार गैरजच्या दारात लावलेली मारुती इस्टीम एमपी ०९ सीबी ९४८६ सिल्व्हर कलरची गाडी रात्री चोरट्यांनी लंपास केली.
सदर गैरेज मालकाने कारचा शोध घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले असता चोरट्याने गाडी पहाटे ४.३० च्या सुमारास बोरगाव मार्गावरील दूधगंगा नदीवरुन घेऊन गेल्याचे समोर आले आहे. त्यात चोरट्याचा चेहरा अस्पष्टपणे दिसत आहे. बेडकिहाळ ते शांतीनगर सर्कल मार्गावरील सुपर बाजाराच्या मागील बाजूचे पत्र्याचे बोल्टस उचकटून चोरट्याने आत प्रवेश करून मुख्य गल्ल्यातील २० हजारांची रोकड लंपास केली आहे. सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्याने लाल रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट घातल्याचे दिसत आहे. बेडकिहाळ सर्कलपासून नदी रस्ता मार्गावरील सागर आप्पासाहेब अलगुरे यांच्या किराणा दुकानाच्या समोरील पत्र्याचे दार उचकटून चोरट्याने सुमारे ३ हजार रुपये लांबविले आहेत. बेडकिहाळ येथे वारंवार चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.