एसीबी ट्रॅप : मास्तर, तुम्ही सुद्धा, एसीबीच्या जाळ्यात सापडलेल्या शिक्षकाने कोणती मागणी केली ?


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

सरकारी नोकरी पगारात भागत नाही लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न क्षणात भंग झाले , चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी तब्बल 40 हजार रुपयांची लाच घेताना अमित राजेश पंड्या या उपशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खालापूरमध्ये सापळा रचून या लाचखोर शिक्षकाला ताब्यात घेतले.त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमित राजेश पंड्या (47) हा पनवेल तालुक्यातील जाताडेतील प्राथमिक शाळेत उपशिक्षक आहे. शिवाय प्राथमिक शिक्षण विभागाचा तो समन्वयक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार आणि त्यांच्या सोबतचे तीन शिक्षकांचे जून आणि जुलै 2024 या दोन महिन्यांचे पगार काढण्यासाठी लोकसेवक अमित पंड्या याने त्यांच्याकडून 40 हजार रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगड कार्यालयात 4 सप्टेंबर रोजी तक्रार केली होती. त्याप्रमाणे पंड्याने पनवेल एसटी डेपोमध्ये 40 हजारांची लाच स्वीकारणार असल्याचे सांगितले होते.

एसीबीने त्याप्रमाणे पनवेल एसटी डेपोत 4 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता सापळा रचला होता. मात्र, लोकसेवक पंड्याला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. त्यामुळे तो सापळा फसला. मात्र, त्यानंतर पंड्याने 18 सप्टेंबर रोजी खालापूर फाटा येथे पैसे देण्याची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा एसीबीला कळवले आणि नवा सापळा मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर फाटा येथे लावण्यात आला. त्यावेळी अमित पंड्या याला तक्रारदाराकडून 40 हजार रुपये लाच म्हणून स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्रचे अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहाय्यक फौजदार अरुण करकरे, हवालदार महेश पाटील, पोलीस नाईक सचिन आटपाडकर, चालक पोलीस हवालदार सागर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रायगड जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभाग कायम चर्चेत राहणार विभाग आहे. बदली, अनुकंपा भरती यासारख्या विषयात नेहमी अर्थकारण होत असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

अमित राजेश पंड्या हा उपशिक्षक असून तो काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात काम करत आहे. अमित पंड्याला त्याच्या नियुक्त जागेवर त्वरित पाठवा, अशी सूचना कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तीन महिन्यांपूर्वी प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव यांना केली होती. त्यानंतरही पंड्या प्राथमिक शिक्षण विभागात होता. अमित पंड्याच्या डोक्यावर कुणाचा वरदहस्त होता, याची चौकशी होणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post