बशर नवाज : नावाप्रमाणे नावाजलेला माणूस

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com


तेज धूप हो तो और निखर आयेंगे 

हम कोई फुल नही जो मुरझा जायेंगे ...

संघर्षासाठी सिद्ध असल्याचा पुकार सुद्धा अशा तरल शेराने करणाऱ्या ज्येष्ठ बजर नवाज यांचा आज जन्मदिन . त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३५ रोजी औरंगाबाद अर्थात आत्ताचे छत्रपती संभाजीनगर येथे झाला.आणि ९ जुलै २०१५ रोजी ते कालवश झाले. गझल या काव्य प्रकाराचे ते एक अतिशय जाणते होते.ते उर्दू भाषेत लिहायचे. छत्रपती संभाजी नगराला उर्दू कवितेची ,शायरीची दीर्घ परंपरा आहे .ती परंपरा उज्वल करण्यात बशर नवाज यांचे सहा दशकांचे योगदान होते.या महान शायराला केवळ ऐकण्याची नव्हे तर त्यांच्याबरोबर मुशायऱ्यात सहभागी होण्याची संधी मला तीन-चार वेळा मिळाली होती. ही माझ्या गझल प्रवासातील अभिमानाची बाब आहे. गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या गझलसागर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात बशर साहेब काही वेळा येऊन गेले होते.पुरोगामी विचारधारेचा अंगीकार केलेल्या बशर नवाज यांनी आपल्या काव्यात सामाजिक उत्तरदायितपणे ,संवेदनशीलता यांची जपणूक केली होती .उर्दू शायरीत फार आदराने त्यांचे नाव घेतले जाते.त्यांच्या लेखनात जगण्यातील अनुभव नेमकेपणाने व्यक्त व्हायचे.


गझल हा कवितेचाच एक प्रकार आहे. छंदोबद्धता हे तिचे व्यवच्छेदक लक्षण आहे. गझल कोणत्याही भाषेतली असली तरी तिला वृत्त, वजन, मीटर ,छंद , रदीफ,काफीया सोडता येत नाही. मराठी संत, पंत आणि तंत कवितेने सुद्धा छंदोबद्धता जपली आहे .कदाचित म्हणूनच मराठी काव्य परंपरेला व रसिकांना गझल जवळची वाटते.अर्थातच मराठी गझलेबाबत या साऱ्याचे श्रेय फक्त आणि फक्त मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांना द्यावे लागेल. एकीकडे महाराष्ट्रात मराठी गझल लिहिली जात होती, फुलत होती. त्याचवेळी बशर नवाज महाराष्ट्रातच उर्दू गझल संपन्न करत होते. गझल हा शब्द अरबी भाषेमधला.पण गझलेला खरी ओळख दिली ती उर्दू व फारसी भाषेने.फारसी भाषेचे संस्कार घेऊन उर्दू  समृद्ध झाली.मिर तकी मिर हा रूढ अर्थाने उर्दूचा पहिला गझलकार. १७२४ साली जन्मलेल्या मिर पासून सुरू झालेली अनेक शतकांची ही उर्दू, गझलेची परंपरा बशर साहेबांनी महाराष्ट्रातून फार मोठ्या ताकतीने पुढे नेली.


१९५४ पासून गझल लेखन करणारे बशर नवाज शायर होते तसेच समीक्षकही.होते गझल सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता. तसेच ते उत्तम वक्ते होते. डाव्या विचारधारेचा, समतावादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर होता.१९५८ ते १९७३ अशी पंधरा वर्षे औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक म्हणूनही ते निवडून आले होते. स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर हा तरुण शायर तेंव्हा लिहून गेला,


ये एहतमामे चरागां बजा सही लेकिन

सहर तो हो नही सकती दिये जलाने....

 


भूपेंद्र , मेहंदी हसन,भारतरत्न लता मंगेशकर , आशा भोसले, महमद रफी, तलत मेहमूद,गुलाम अली यांच्यापर्यंत अनेकांच्या आवाजात बशर नवाज यांची शायरी सर्वदूर पोहोचली. बाजार या चित्रपटातील भूपेंद्र यांनी गायलेल्या गीताने त्यांची उर्दू साहित्याला ,चित्रपटसृष्टीला , रसिकांना व्यापक ओळख झाली.


गली के मोड पे सुना कोई दरवाजा 

तरसती आखो से रस्ता किसीका देखता ..

निगाहे दूर तलक जाके लोट आयेगी 

करोगे याद तो हर बात याद आयेगी...


 असे सांगणारा हा शायर केवळ दहावीपर्यंत शिकला होता. पण जीवनाला भिडण्याची व तो अनुभव शब्दात मांडण्याची त्यांची ताकद विलक्षण होती. त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठ उर्दू शायर निदा फाजली म्हणाले होते, 'मानवी जीवनातील सुखदुःख सहजपणे मांडणारा शायर गेला.त्यांची शायरी कैफी आजमींच्या तोडीची होती.विषय , लेहजा आणि घाट  या तिन्ही अंगाने बशर नेहमीच लक्षात राहतील. '


'हाथेलीयोंकी हिना याद कुछ दिलायेगी ' म्हणणारे बशर साहेब सहजपणे लिहून गेले की' जुल्फे खुली तो मस्त घटा गीर छा गई ,आचल उडा तो एक कयामतसी आ गई '...शृंगारिक म्हणजे रूमानी आणि सुधारणावादी म्हणजे तरक्की पसंद अशा दोन्ही प्रकारची शायरी तेवढ्याच ताकतीने बशर साहेबांनी लिहिली.


जाहते तो किसी पत्थर की तरह जी लेते 

 हमने खुद मोम की मानिंद पिघलना चाहा..


बहते पानी की तरह दर्द की भी शक्ल नही 

जब भी मिलता है नया रूप हुआ करता है...


तेरा क्या तू तो बरस की खुल गया 

 मेरा सब कुछ बह गया सैलाब मे...


 जब छायी घटा लहरायी थनक 

एक हुस्न मुकम्मल याद आया 

उन हाथो की मेहंदी याद आयी 

उन आखो का काजल याद आया ...


असे लिहिणारे बक्षर साहेब जातीय दंगली ,धार्मिकता, दुःख याबाबत संवेलनशील होते.'गम अपना हो या पराया तडप उठता हू  'असे ते म्हणत आणि तसेच जगत. म्हणून ते लिहून गेले ,


हम अपनी रीवायत से बगावत नाही करते

नफरत बढाने की जरासत नही करते

 रखते है बडे प्यार से हर घाव पे मरहम 

हम कौम की जख्म की सियासत नही करते...


मराठी साहित्याचा विचार करताना आपण साठोत्तरी लेखनाचा एक वेगळा विभाग करतो. त्याच पद्धतीने उर्दूतील साठोत्तरी लेखनाचा विचार केला तर त्या काळातील महत्त्वाचे कवी म्हणून बशर साहेबांचा आक्रमाने उल्लेख करावा लागेल .आजच्या बदलत्या जगात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. अपराधी उजळ माथ्याने वावरत आहेत. त्यांना पद ,प्रतिष्ठा ,पैसा सारे मिळते .पण निरपराधी माणसांवर हल्ले होत आहेत. हे सांगताना बशर म्हणतात 


पत्थर को मेरे सिमत तो आना जरूर था

मैं ही उन गुनाहगारो मे एक बेकसुर था..


 रायगा आणि अजनबी समुंदर हे त्यांच्या कविता संग्रह अतिशय गाजले.नया आदब नये मिसाइल हा त्यांचा समीक्षा ग्रंथ ही आहे. दूरदर्शनसाठी अमीर खुसरो या मालिकेचे तेरा भाग त्यांनी लिहिले .ऑल इंडिया रेडिओ साठी सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा चे सव्वीस भाग त्यांनी लिहिले .दूरदर्शनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेचे लेखन त्यांनी केले. बशर नवाज यांच्या साहित्याचे हिंदी, कन्नड ,पंजाबी आदी अनेक भाषांत अनुवाद झाले .महाराष्ट्र सरकार ,साहित्य अकादमी, उर्दू अकादमी , पुलोत्सव सन्मान, गालिब पुरस्कार यासह अनेक संस्थांनी त्यांच्या लेखनाचा सन्मान केला. रसिकांनी तर त्याच्यावर भरभरून प्रेम केले .बशर म्हणजे माणूस आणि नवाज म्हणजे लौकिकपात्र .आपल्या नावाप्रमाणे बशर नवाज एक लौकिक प्राप्त माणूस होते. सामाजिक वेदना व दुःख नेमके शब्दात मांडणाऱ्या या शायराच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. ते म्हणाले होते ,


बहुत था खोंफ जिस का फिर वही किस्सा निकल आया

 मेरे दुखसे किसी आवाज का रिश्ता निकल आया....


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post