प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
५० टक्के टोल कमी होण्याची आशा : दरम्यान महामार्गावर सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या कालावधीत वाहनधारकांना 50% टोल सवलत द्यावी असा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवला असल्याचं पत्र प्राधिकरणाकडून आमदार सतेज पाटील यांना देण्यात आलं. तसंच महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसात बुजवण्याचं आश्वासनही काँग्रेसच्या शिष्टमंडळाला देण्यात आलं आहे. आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला असून काम पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पुणे बंगळुरू आणि पुणे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात महामार्गाचे सहा पदरीकरण सुरू असल्यानं पुण्याकडे ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गावर वाहनधारकांना सेवा मिळत नसेल, तर टोल कशाचा आकारता? सहा पदरी रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत पुणे ते कोल्हापूर मार्गावरील टोलवसुली तत्काळ बंद करण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं आंदोलन केलं. तसंच सातारा जिल्ह्यातील तासवडे टोलनाक्यावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसनं आक्रमक आंदोलन केलं.
जोपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था सुधारत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका यावेळी आमदर सतेज पाटील यांनी घेतली. तसंच टोलवसुली बंद करण्यासाठी आम्ही रस्त्यावर तळ ठोकणार असा इशारा देखील त्यांनी दिला. यावेळी जयंत आसगावकर यांच्यासह जयश्री जाधव, राजू आवळे, सांगलीच्या जयश्री पाटील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.