मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; इंजिनिअरला अटक

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर जाऊन स्वत: रस्त्याची पाहणी केली.  मात्र, यावेळी रस्त्याची खराब अवस्था पाहून त्यांनाही राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं कारण, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळावरुनच संबंधितांना फोन करुन रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्याला तुरुंगात टाका, असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार, आता मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  मुंबई गोवा महामार्गच्या माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील इंदापूर ते बहाने 26.7 कि.मी. अंतरावरील या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदा चेतक इंटरने लिमिटेड आणि अपको इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने संयुक्तपणे 18 डिसेंबर 2017 पासून सुरू केले होते.

   मात्र, कामात अक्षम्य चूका आणि विहित मुदतीत काम पूर्ण न केल्याने अनेक प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत ठेकेदार कंपनीच्या प्रमुखांवर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई-गोवा महामार्गावरुन  अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.

   येथील महामार्गावर सन 2020 पासून आजपावेतो मुंबई गोवा महामार्गावरील संबधित रस्त्यावर नमूद एकूण 170 मोटार अपघात होण्यास व त्यामध्ये एकूण 97 प्रवाशांच्या मृत्यूस आणि एकूण 208 प्रवाशांना लहान/मोठ्या स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती होण्यास त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीस कारणीभूत झालेले आहेत.

   म्हणून मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), 501, नमन सेंटर, सी-31, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-51 या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व नमूद प्रकल्पावर काम करणारे नमूद कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांचे तक्रारीवरुन माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजि. क्रमांक 198/2024 भारतीय न्याय संहीता कलम 105,125 (अ) (ब) व 3 (5) अन्वये गुन्हा  नोंद करण्यात आलेला आहे. 

  याप्रकरणी प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील अधिक तपास पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बेलदार हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post