बदलापूर मध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे उरण मध्ये जन आक्रोश आंदोलन,

 शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी शासनाचा घेतला खरपूस समाचार


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

  देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत. कुठे विनयभंग, कुठे बलात्कार तर कुठे अश्लील चाळे तर कुठे अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण, वेगवेगळे आमिष प्रलोभनातून महिलांच्या हत्या असे विविध घटना देशात व महाराष्ट्रात होत असल्यामुळे जनतेत या घटना विरोधात तीव्र संताप निर्माण झाले आहे. देशात व महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला कुठेही सुरक्षित नाहीत त्यामुळे महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ व बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपीना कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे उरण शहरातील बाझारपेठ येथील गांधी चौकात दुपारी १२ वाजता जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.

     बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे संतप्त पालकांनी बदलापूर बंदची हाक दिली.  बदलापूर परिसरात जनता रस्त्यावर उतरल्यानं आंदोलन चिघळलं. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन झाले.बदलापूर आंदोलकांकडून नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे.या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे उरण मध्ये गांधी चौक येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली ती शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांची. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.बदलापूर येथील झालेला घटनाचा आम्ही सर्व प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने व विविध संस्था संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो. दोन दिवसापूर्वीच रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. बहिणीने भावांना राख्या बांधल्या आहेत. या राख्यांचा अर्थ या सरकारला कळत नसेल किंवा त्या नराधमांना कळत नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला आम्ही कमी पडणार नाही. सरकारला, पोलिसांना आम्ही नेहमी वारंवार सांगत आलो आहे की तुम्ही निर्णय लवकर देत जा. लवकर निर्णय घ्या. उरण मधील यशश्री शिंदे निर्घृण हत्या प्रकरणात नराधमाला दोन दिवसात अटक झाली. मात्र पुढे काय झाले याची काहीच माहिती नाही. लवकर निर्णय न घेतल्याने असे वारंवार घटना घडत आहेत. उरण मधील घटना ताजी असतानाच लगेच बदलापूर मध्ये घटना घडली. या राज्यात चालले तरी काय. राख्या कशाला पाहिजेत. राखीचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर असल्या सरकारचे व असे व्यवस्थापनाचे काहीच काम नाही. मग महिलांना सामाजिक संस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल. व्यवस्थापकांना ताब्यात घ्यावे लागेल. आता आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आता आम्ही थांबणार नाहीत आम्हाला निर्णय हवेत. आमच्या मुली, आमच्या राख्या सुरक्षित नाही आहेत. आज महिला कुठेही सुरक्षित नाही. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे छोटे व्यावसायिक महिला, शाळेत जाणारे लहान मुली, नोकरदार वर्ग कोणीच सुरक्षित नाही.आजच्या चिमुकल्या मुलींना भीती पोटी बाहेर कुठेही सायकल चालवता येत नाही. छोटया चिमुकल्या मुलीच्या सुरक्षेसाठी त्या लहान मुली बरोबर आईलाही घराबाहेर पडावे लागत आहे. पण त्या मुलीच्या आई देखील सुरक्षित नाही आहेत. मग त्या चिमुकल्या मुलीला घेउन घरात बसायची वेळ आज आईला आली आहे. ही वेळ आम्हाला नको. त्यासाठी आम्ही हा जन आक्रोश आंदोलन काढला आहे. हा मोर्चा साधेपणाने काढला आहे. मात्र हे असेच चालू राहिले तर पुढे जाऊन चक्काजाम,रस्ता जाम आंदोलन करावे लागेल. असा आक्रमक शब्दात शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी शासनाला इशारा दिला. बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा व शासनाचा प्रीतम म्हात्रे यांनी खरपूस समाचार घेतला. 

     यावेळी उरण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, शाखा प्रमुख,चिटणीस, सरपंच, सदस्य, युवक संघटना, महिला आघाडी, युवा सेना, विद्यार्थी संघटना, तसेच महाविकास आघाडीच्या अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post